Tue, Jul 16, 2019 01:51होमपेज › Goa › राज्यात 7 जूनपर्यंत मान्सून दाखल

राज्यात 7 जूनपर्यंत मान्सून दाखल

Published On: May 30 2018 2:17AM | Last Updated: May 29 2018 11:43PMपणजी : प्रतिनिधी

राज्यात येत्या 7 जूनपर्यंत मान्सून दाखल होईल, असा अंदाज आहे. यंदा गोव्यात मान्सून समाधानकारक असेल, अशी   शक्यता   पणजी वेधशाळेचे संचालक मोहनलाल साहू यांनी व्यक्‍त केली आहे.दरम्यान, अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात  ठिकठिकाणी ढगांच्या गडगडाटासह तसेच विजांच्या लखलखाटासह  पाऊस पडण्याची शक्यताही   वेधशाळेने व्यक्‍त केली आहे. 
राज्यात काही दिवसांपासून    मान्सूनपूर्व पाऊस विशेषतः रात्रीच्या वेळी पडत आहे. अचानक ढगाळ वातावरण होऊन मंगळवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी  कोसळल्या. त्यामुळे  सकाळी कामाला जाणार्‍या लोकांची काही प्रमाणात तारांबळ उडाली. संध्याकाळच्यावेळीदेखील पावसाची रिपरिप सुरुच होती.     

समुद्रात ताशी 40 ते 50 किलोमीटर्स वेगाने वारे वाहत आहे.  वार्‍याची गती ताशी 60 किलो मीटर्सपर्यंत  वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे  मच्छीमारांनी पुढील 24 तास समुद्रात जाऊ नये, असा इशाराही वेधशाळेकडून देण्यात आला आहे. वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार, पेडण्यात 2.2 मि.मी., पणजीत 23 मि.मी., जुने गोवेत  0.2 मि.मी., साखळीत 3 मि.मी., काणकोणात 11.6 मि.मी.,दाबोळीत  15.4 मि.मी., मुरगावात 2.2 मि.मी., मुरगावात 2.9 मि.मी., केपेत 2.8 मि.मी. व सांगेत  11.8 मि.मी. पावसाची नोंद  झाली आहे.