Tue, Nov 19, 2019 10:59होमपेज › Goa › मान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर

मान्सून आणखी दोन दिवस लांबणीवर

Published On: Jun 16 2019 1:44AM | Last Updated: Jun 16 2019 1:44AM
पणजी : प्रतिनिधी

राज्यात पावसाची वृष्टी काही प्रमाणात कमी झाली आहे. शनिवारी काही ठिकाणांवर पावसाने जोरदार हजेरी लावली, तर काही ठिकाणांवर पाऊस तुरळक प्रमाणात बरसला. गेल्या 24 तासांत तापमानातही वाढ झाली आहे. राज्यात मान्सूनचे आगमन यंदा आणखी दोन दिवस लांबणीवर पडले आहे, अशी माहिती गोवा वेधशाळेचे संचालक डॉ. कृष्णमूर्ती पडगलवार यांनी दिली.

डॉ. कृष्णमूर्ती म्हणाले, चक्रीवादळ ‘वायू’चा प्रभाव आता राज्यावर राहिलेला नाही. मान्सून 12 ते 15 जून दरम्यान दाखल होण्याची शक्यता यापूर्वी व्यक्‍त करण्यात आली होती. मात्र, मान्सूनचे आगमन कळण्यासाठी आणखी दोन दिवस हवामानाच्या हालचालींवर लक्ष ठेवून वाट पहावी लागेल. मान्सूनचे आगमन सध्या निश्‍चितपणे सांगणे कठीण आहे, असेही त्यांनी सांगितले. 

राज्यात 16 जून रोजी सामान्य ते तुरळक प्रमाणात पावसाची शक्यता असून त्यानंतर 17, 18, 19 जून रोजी जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तवली आहे. राज्यावर वायू चक्रीवादळाचा प्रभाव ओसरला असला तरीही अरबी समुद्रात सोमालिया किनारपट्टीवर 16, 17 व 18 जून रोजी वादळी वारे वाहणार आहे. तसेच समुद्रात लाटांची उंचीदेखील वाढली आहे.

त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये, असा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे. 

राज्यात गेल्या 24 तासांत पडलेल्या पावसानंतर कमाल तापमान 32.5 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 28 अंश सेल्सिअस इतके नोंद झाले. शनिवारी वातावरणात उष्णता वाढली होती. किमान तापमानातही वाढ झाली आहे. येत्या 24 तासांत कमाल तापमान 33 अंश सेल्सियस व किमान तापमान 27 अंश सेल्सियस इतके असेल. 

राज्यात शनिवारी काही ठिकाणांवर पावसाने हजेरी लावली. गेल्या 24 तासांत केपे, म्हापसा, काणकोण या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात पाऊस होता. काही ठिकाणांवर तुरळक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. वेधशाळेच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत राज्यात केपे येथे सर्वाधिक 24.6 मी.मी. पावसाने हजेरी लावली. तसेच काणकोण येथे 13.2 व म्हापसा येथे 12.0 मी.मी. पावसाची नोंद झाली. 

‘वायू’चा प्रभाव घटला

वायू चक्रीवादळ 15 जून रोजी पोरबंदर किनार्‍याकडून 275 कि. मी., वेरावळकडून 330 कि. मी. तर दिवच्या पश्‍चिमेला 385 कि. मी. इतक्या अंतरावर होते. येत्या 24 तासांत चक्रीवादळ हळूहळू पश्‍चिमी दिशेला वळणार असून वादळाचा प्रभाव कमी होत जाणार आहे. त्यानंतर 17 जूनच्या संध्याकाळपर्यंत वादळ कच्छ व सौराष्ट्र किनारपट्टीवर पोहोचेल, असे वेधशाळेकडून सांगण्यात आले.