Fri, Nov 16, 2018 21:19होमपेज › Goa › मान्सूनचे आगमन ६ जूनला

मान्सूनचे आगमन ६ जूनला

Published On: Jun 03 2018 1:13AM | Last Updated: Jun 03 2018 12:21AMपणजी : प्रतिनिधी 

राज्यात गतवर्षी 8 जून रोजी मान्सूनच्या पावसाचे आगमन झाले होते. यंदा मान्सून दोन दिवस अगोदर म्हणजे 6 जूनपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती गोवा वेधशाळेचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिली.

साहू म्हणाले की, राज्यात सध्या मान्सूनपूर्व पाऊस सक्रिय झाला असून पेडण्यात गेल्या 24 तासांत सर्वाधिक 3 इंचाहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस रात्री उशिरा काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर मंगळवारपासून पावसाचे प्रमाण वाढणार आहे. सध्याचे वातावरण पाहता यंदा मान्सून लवकर दाखल होण्याचे संकेत आहेत. 

राज्यभरात शुक्रवारी रात्री एला (जुने गोवे), दाबोळी, काणकोण, सांगे, केपे, म्हापसा व मुरगाव भागात जोरदार पाऊस कोसळला. वेधशाळेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार   शुक्रवारी  संध्याकाळपासून एला (जुने गोवे) येथे  3 इंच,  दाबोळी व काणकोण भागात प्रत्येकी 2 इंच, सांगे येथे 1 इंच पावसाची नोंद झाली. केपे भागात 2 सें.मी., म्हापसा, मुरगाव, साखळी, पणजी, फोंडा व वाळपई भागात प्रत्येकी 1 सें.मी. पावसाची नोंद झाली आहे. 

वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील तापमानात काही अंशांनी घट झाली आहे. राज्यातील कमाल तापमान  33.7 अंश सेल्सिअस तर  किमान  तापमान 23  अंश सेल्सिअस इतके नोंद झाले आहे. गेल्या 24  तासांत पणजी व मुरगाव भागात सर्वाधिक 34 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.