पणजी : प्रतिनिधी
गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या अमेरिकन महिला पर्यटकाचा विनयभंग केल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी पेडणे येथील इजिदोर फर्नांडिस याला अटक केली. पीडित महिलेने विनयभंगाची माहिती संशयिताच्या फोटोसह तिच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला अटक केली. संशयिताने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
अमेरिकेतील न्यूयॉर्क ची रहिवाशी असलेली 44 वर्षीय पीडित महिला गोव्यात पर्यटनासाठी आली होती. 26 जानेवारी रोजी ती हडफडेहून मोरजी किनार्याकडे संशयित फर्नांडिसच्या मोटारसायकलवरून गेली होती. तेथून हॉटेलकडे परतताना संशयिताने तिच्याशी गैरवर्तन केले. त्यानंतर पीडित महिलेने मोटारसायकलवरून खाली उतरून संशयित फर्नांडिस याच्यावर 500 रुपयांची नोट फेकून तेथून पळ काढला, असे या पीडितेने आपल्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.
दरम्यान, हणजूण पोलिसांनी संशयिताला हरमल किनार्यावरून अटक केली. सदर गुन्हा हा पेडणे पोलिस स्थानकाच्या हद्दीत घडल्याने त्याला पेडणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.