Sun, Jul 21, 2019 01:26होमपेज › Goa › आधुनिक तंत्रज्ञान काळाची गरज

आधुनिक तंत्रज्ञान काळाची गरज

Published On: Jan 10 2018 1:57AM | Last Updated: Jan 10 2018 12:22AM

बुकमार्क करा
म्हापसा : प्रतिनिधी

आधुनिक  तंत्रज्ञानाने आमचे जीवनच बदलून टाकले आहे.  तंत्रज्ञान ही काळाची गरज आहे. परंतु माणसाने मानवतेच्या  दृष्टीने जगणे तितकेच महत्वाचे आहे. सुसंस्कारित माणूस बनून संगणकाचा वापर करा, असे आवाहन   गोवा आर्थिक  विकास महामंडळाचे अध्यक्ष सिद्धार्थ कुंकळकर यांनी केले.

सारस्वत शैक्षणिक संस्थेच्या आनंदगिरी केणी सभागृहात आयोजित केलेल्या लॅपटॉप वितरण   कार्यक्रमात प्रमुख अतिथी या नात्याने कुंकळकर बोलत होते.  व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष अशोक केंकरे,उपाध्यक्ष रूपेश कामत, शिक्षण संचालक गजानन भट,  पुरूषोत्तम वालावलकर उच्च माध्यमिक हायस्कूलचे प्राचार्य अनील सामंत  उपस्थित होते.

कुंकळकर म्हणाले, की संगणक  वापरामुळे व्यावहारिक खर्च   कमी होणार आहे. कारण सगळीच माहिती केवळ एका संगणकावर असणार आहे. आधुनिक अशा या संगणक  जीवन पद्धतीचा आजच्या काळात प्रत्येकाने  स्वीकार करणे गरजेचे आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी 2000 सालात दूरद‍ृष्टी ठेवून मुलांना संगणक  देण्याची संकल्पना मांडली  आणि सायबर एज योजनेतून  संगणक देण्यास सुरवात केली. सद्या मुलांना लॅपटॉप देण्यात येत आहेत.   30 हजार विद्याथ्यार्ंना लॅपटॉप देण्यात आले असून राहिलेल्यांना काही दिवसात   दिले जातील. खरे  म्हणजे हे विद्यार्थी भाग्यवान आहेत. केवळ 1 हजार रूपयात 20 हजारांचा लॅपटॉप मिळत आहे. अधिकचे पैसे सरकारच्या तिजोरीतून म्हणजेच तुमच्या आमच्या खिशातून कराच्या रूपाने  भरलेल्या रक्कमेतून खर्च झालेले  आहेत.  लॅपटॉपचा चांगला उपयोग करून  आपल्या ज्ञानाच्या कक्षा  वाढवा,  असे  त्यांनी   सांगितले.

जीवनात नेहमी बदल होत असल्याने या बदलांचा अभ्यास करण्यासाठी आपण नेहमी अभ्यासूवृत्ती ठेवावी व नवे ज्ञान मिळवावे, असे    कुंकळकर यांनी सांगितले. रूपेश कामत यांनी स्वागत केले. विद्या आरोलकर यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली.  प्रा. अनील सामंत यांनी आभार मानले.