Wed, Jul 17, 2019 18:53होमपेज › Goa › गोमेकॉत आधुनिक रक्त चाचणी केंद्र 

गोमेकॉत आधुनिक रक्त चाचणी केंद्र 

Published On: May 23 2018 1:12AM | Last Updated: May 23 2018 12:58AMपणजी : प्रतिनिधी

बांबोळी येथील गोेमेकॉ इस्पितळात आता रक्त तपासणीसाठी ‘सी आय 8200 आर्किटेक्ट  अबोट मशीन’ असलेले केंद्र सुरू करण्यात आले आहे. हे रक्त तपासणीसाठीचे  गोव्यात  एकमेव आधुनिक यंत्र असून   दरदिवशी अडीच हजार रक्त नमुने तपासता येणार आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे यांनी   ट्विटर संदेशाद्वारे दिली.

‘सी आय 8200 आर्किटेक्ट  अबोट मशीन’मुळे गोमेकॉत येणार्‍या रुग्णांना आता एकाचवेळी रक्ताच्या वेगवेगळ्या चाचण्या अवघ्या काही मिनिटांत करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. त्यामुळे रुग्णांना  रक्ताची चाचणी करण्यासाठी लागणार्‍या वेळेची बचत होणार असून   गैरसोयीतूनही  सुटका  होणार आहे.

गोमेकॉत रक्त चाचणीच्या प्रयोगशाळेची सुविधा नसल्याने    गोमेकॉत उपचारासाठी येणार्‍या  रुग्णांना रक्त चाचणी  बाहेरून करून घ्यावी लागतेे. त्यामुळे रुग्णांना बराच  पैसा खर्च करावा लागतो. रुग्णांची होणारी ही गैरसोय लक्षात घेता आता गोमेकॉत दोन सी आय 8200 आर्किटेक्ट अबोट मशिन्स कार्यरत करण्यात आल्याचे मंत्री राणे यांनी ट्विटरवर म्हटले आहे.

या मशिनमध्ये रक्ताचे केवळ दोन ते तीन थेंब घातल्यानंतर रक्ताची चाचणी करणे शक्य होणार आहे.  यामुळे रुग्णांना होणारे आजार समजणे सोपे होईल. तसेच रुग्णांवर त्वरित उपचार करणेही सोपे होणार आहे. संपूर्ण गोव्यात गोमेकॉ हे एकमेव इस्पितळ आहे ज्यात अशा प्रकारची सुसज्ज अशी रक्त नमुन्यांची चाचणी करण्यासाठीची यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. गोमेकॉत अशा प्रकारचे मशिन कार्यान्वित करण्याबाबतची माहिती यापूर्वीच आरोग्यमंत्री राणे यांनी दिली होती.