Sat, Apr 20, 2019 10:30होमपेज › Goa › देशात अघोषित आणीबाणी 

देशात अघोषित आणीबाणी 

Published On: May 10 2018 1:34AM | Last Updated: May 09 2018 11:58PMपणजी : प्रतिनिधी

देशात अघोषित आणीबाणीच लागू  असून लोक स्पष्ट बोलण्यासही घाबरत आहेत. सध्याची आणीबाणी  लोकांना उमजत नसली तरी ते एक प्रकारेे ‘स्लो पॉयझनिंग’ असल्याचे मत माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी व्यक्‍त केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अचानक  आणीबाणी जाहीर करून अनेक विरोधकांना एका रात्रीत अटक करून तुरूंगात टाकले होते. या घटनेमुळे सर्व देशात आणीबाणी लागू झाल्याचे जनतेला कळून आले होते.मात्र, सध्याची स्थिती न कळणारी आहे,असेही सिन्हा म्हणाले.‘लोकशाहीसाठी नागरिक’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे दोनापावला येथील ‘गोवा इंटरनॅशनल सेंटर’मध्ये आयोजित  ‘भारतीय अर्थव्यवस्था आणि लोकशाहीसमोरील आव्हाने’ या विषयावरील  परिसंवादात  सिन्हा बोलत होते. 

ते म्हणाले, की  देशभरात बेरोजगारी, महागाई, आर्थिक अविकास आदी समस्यांमुळे जनतेत मोठ्या प्रमाणात असंतोष माजला आहे. युवक, महिला तसेच शेतकरी  नाखूष  आहे. त्यांना खोटी  आश्‍वासने देऊन आणि आमिषे दाखवून बोळवण केली जात आहे. महाराष्ट्रात सुमारे 35 हजार शेतकर्‍यांनी नाशिक ते मुंबईपर्यंत शांततेने भव्य रॅली काढली, या शेतकर्‍यांना दिलेल्या आश्‍वासनांचे अजूनही पालन होत नाही. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना उपोषणातून माघार  घेऊन  हटण्यासाठी त्यांचीही आश्‍वासनांवर बोळवण केली जात आहे.  लोकांचा राजकारणावरून विश्‍वास उडत चालला आहे. त्यामुळे ,  देशातील सुमारे 110 शेतकरी संघटना एकत्र येऊन 1 जूनपासून ‘गाव बंद’ आंदोलन सुरू करणार आहेत. या आंदोलनात ग्रामीण भागातील जनता शहरात जाणे सोडणार असून गावातून भाजीपाला, फळे आदी वस्तूंची  शहरात विक्री बंद केली जाणार आहे. देशभर पसरणार्‍या या आंदोलनामुळे शहर आणि गाव या दोन्हींमध्ये मोठी दरी निर्माण होणार आहे. यासारखेच अनेक लहान मोठे वर्ग एकत्र आल्यास देशाचे अर्थकारण ठप्प होण्याचा दिवस दूर नाही. 

संसद  ही देशातील सर्वोच्च कायदेनिर्मिती  संस्था आहे. या संसदेत कामकाजच चालत नसून अवघ्या चार दिवसात देशाचा अर्थसंकल्प मांडून त्याला मंजुरीही दिली जाते, ही अचंबित करणारी बाब आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारचे बहुमत असूनही विरोधी काँग्रेस पक्ष व अन्य पक्ष लोकसभेचे कामकाज चालवू देत नाहीत, म्हणून भाजपचे खासदार उपोषण करतात, ही गंमतच आहे. मात्र संसदेत कामकाज न चालवण्यामागे  रालोआ सरकारचाच हात आहे. भाजपने अण्णाद्रमुक पक्षाच्या खासदारांना हाताशी धरून कामकाज रोखले असल्याचा आरोप सिन्हा यांनी केला. राजकारण्यांनी देशातील न्यायालय, सीबीआय, मीडिया, आयकर आदी यंत्रणा आपल्या दाव्याला  बांधल्या असून निवडणूक यंत्रणाही वेठीस धरली आहे. ‘आप’च्या 20 खासदारांना बचावाची कोणतीही संधी न देता निवडणूक आयोगाने निलंबित  केले आहे,अशी टीकाही त्यांनी केली.

व्यासपीठावर भाजपचे नेते शत्रुघ्न सिन्हा, समाजवादी जनता पक्षाचे सरचिटणीस रवींद्र मनचंदानी तसेच ‘लोकशाहीसाठी नागरिक’ संस्थेचे   निमंत्रक डॉ. मनोज कामत  आणि सह- निमंत्रक एल्वीस गोम्स  उपस्थित होते. परिसंवादासाठी राज्यभरातून विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, आंदोलकांनी तसेच चर्च संस्थेच्या प्रतिनिधींनी हजेरी लावली होती. याशिवाय भाजप वगळता काँग्रेस, आप, शिवसेना आदी विरोधी राजकीय पक्षांच्या काही नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही गर्दी केली होती.