Thu, Nov 15, 2018 01:37होमपेज › Goa › सरकारला तूर्त धोका नाही

सरकारला तूर्त धोका नाही

Published On: Sep 01 2018 1:45AM | Last Updated: Aug 31 2018 11:45PMपणजी : प्रतिनिधी

काँग्रेस आमदारांच्या मदतीने नवे सरकार स्थापन करण्याच्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (मगो) हालचाली सुरू आहेत, ही अफवा असून त्यात तथ्य नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आरोग्याची गंभीर समस्या असती तर नेतृत्व बदलाबाबत एकवेळ विचार होऊ शकला असता. मात्र, तसे कोणतेही कारण नसल्याने भाजप आघाडी सरकार मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या नेतृत्वात बलवान असून त्याला तूर्त कोणताही धोका नाही, असा निर्वाळा सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिला.

पाटो येथील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी अनौपचारिकरीत्या बोलताना ढवळीकर यांना सरकारात बदल होण्याची शक्यता आहे का, असा प्रश्‍न पत्रकारांनी केला असता  ते म्हणाले, राजकारणात अफवा या सुरूच असतात, त्या अफवांचे वारंवार खंडन करणे हेच राजकारण्यांचे काम असू नये. या अफवांबाबत आपली काहीही बोलण्याची इच्छा नाही. पर्रीकर हे सक्षम मुख्यमंत्री असून त्यांच्या नेतृत्वाखालीच सरकार स्थापन करण्याचे आम्ही आश्‍वासन दिलेले होते.  त्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारचे काम योग्य दिशेने जात आहे. सरकार उलथण्याचे कोणतेही प्रयत्न  सुरू नाहीत. 

ढवळीकर म्हणाले की, राज्याला सध्या पर्यायी मुख्यमंत्री अथवा त्रिमंत्री सल्लागार समिती नेमण्याची गरज आहे, असे आपल्याला वाटत नाही. राज्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अनुपस्थित असले म्हणून तात्काळ पर्यायी व्यवस्था करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. मुख्यमंत्री पर्रीकर हे फक्‍त आठ दिवसांसाठी आणि वैद्यकीय उपचाराकरिता विदेशात गेले असल्याने त्याचा गंभीर परिणाम प्रशासनावर होण्याचा धोका नाही. मात्र,   त्यांना  भविष्यात दीर्घकाळासाठी पुन्हा विदेशात जावे लागल्यास पर्यायी व्यवस्थेबाबत विचार होऊ शकतो. मात्र सध्या तशी कोणतीही परिस्थिती नाही. 

आगामी लोकसभा निवडणुकीत मगो पक्षाची भूमिकेबाबत पक्ष  कार्यकारिणीने  नेमलेली विशेष समिती   निर्णय घेणार आहे. आपण मगोचा नेता असलो तरी धोरणात्मक निर्णय पक्षच घेत असतो, असे ढवळीकर यांनी एका प्रश्‍नावर सांगितले. आपली प्रकृती पूर्णपणे सुधारली असून आपण आजारातून बाहेर पडलो आहोत. जनतेच्या आशीवार्दामुळे आणि प्रेमामुळेच आपण पुन्हा उभे राहू शकलो, असे ढवळीकर यांनी सांगितले.