Sun, Mar 24, 2019 04:27होमपेज › Goa › आंदोलन शांततापूर्ण, शिस्तबद्ध व्हावे : मंत्री सुदिन ढवळीकर

आंदोलन शांततापूर्ण, शिस्तबद्ध व्हावे : मंत्री सुदिन ढवळीकर

Published On: Mar 19 2018 1:46AM | Last Updated: Mar 19 2018 1:46AMपणजी : प्रतिनिधी

खाण अवलंबितांचा सोमवारी पणजीत होणारा नियोजित मोर्चा शांततापूर्ण आणि शिस्तबद्ध व्हावा. बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरू असल्याने सदर आंदोलन येथील आझाद मैदानावर न घेता कांपाल येथील परेड मैदानावर घ्यावे, असे आवाहन  त्रिमंत्री  समितीच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी केले. 

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत प्रशासनाचा ताबा देण्यात आलेल्या त्रिमंत्री  समितीचे सदस्य तथा मंत्री सुदिन ढवळीकर, नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा आणि कृषिमंत्री विजय सरदेसाई यांनी मुख्य सचिव धर्मेश शर्मा, पोलिस महासंचालक मुक्‍तेश चंदर आणि उत्तर गोवा जिल्हाधिकारी निला मोहनन यांच्यासोबत  रविवारी संध्याकाळी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी प्रशासनातील  विविध खात्यांचे अधिकारीही मोठ्या संख्येने  उपस्थित  होते.

या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत माहिती देताना मंत्री ढवळीकर म्हणाले, की खाण भागातील ट्रक, बार्ज, मशिनरी तसेच अन्य अवलंबितांचा मोर्चा सोमवारी पणजीत धडकणार असल्याने  शहरात मेगाब्लॉक  होण्याची शक्यता आहे. वेर्णा ते पणजी तसेच पर्वरी ते पणजी या राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची  भीती आहे. बारावीच्या विद्यार्थ्यानी पेपर देण्यासाठी किमान तासभर आधी घराबाहेर पडण्याची तसेच पर्यटकांनी सोमवारी किमान अर्धा दिवस हॉटेलबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून आपण करत आहोत. 

खाण अवलंबितांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केल्यास वा मोर्चा काढल्यास प्रशासन सहकार्य करण्यास तयार आहे. मात्र, त्यांनी सामान्य लोकांना व खास करून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी मोर्चेकर्‍यांनी पणजीत सोमवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या आधी यावे. तसेच   येथील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आझाद मैदानावर सभा न घेता कांपाल येथील परेड मैदानावर घ्यावी, असे आवाहन ढवळीकर यांनी केले.