Mon, Mar 25, 2019 05:18
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › भाजप सरकार लोककल्याणासाठी प्रयत्नशील 

भाजप सरकार लोककल्याणासाठी प्रयत्नशील 

Published On: Jan 24 2018 1:22AM | Last Updated: Jan 23 2018 11:54PMडिचोली : प्रतिनिधी

भाजप सरकार हे गरीब जनतेचे असून गरीब  लोकांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील आहे.  केंद्र  सरकारला चार वर्षे पूर्ण होत असताना घरगुती गॅसवर सवलत देण्यात यश आले आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजने अंतर्गत  आतापर्यंत  3 कोटी मोफत गॅससिलिंडर  जोडण्या   देण्यात आल्या आहेत.   5 कोटी  गॅस जोडण्या देण्याचे उद्दिष्ट आहे,  असे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले.

लाटंबार्से पंचायत सभागृहात पंतप्रधान उज्ज्वला योजनेद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या  गॅस सिलिंडर जोडणीच्या जागृती  कार्यक्रमात मंत्री नाईक बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा पंचायत सदस्य संजय शेटये, सरपंच प्रशांत घाडी, उपसरपंच समीर गावस, माजी उपसरपंच बाबासाहेब राणे, कामत गॅस सर्व्हिसचे अतुल कामत, पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे वैभव भगत उपस्थित होते. 

सरपंच प्रशांत घाडी म्हणाले, की आतापर्यंत तीन कोटी जनतेपर्यंत सरकारने मोफत गॅस सिलिंडर वितरित केले असून आगामी काळात 5 कोटींचे उद्द्ष्टि सरकार पूर्ण करणार आहे. या योजनेचा लाभ बीपीएल कार्डधारकांना होत असून जास्तीत जास्त बीपीएल कार्डधारकानी याचा लाभ घ्यावा. लोकांना  यासाठी पंचायत सहकार्य करील. 

वैभव भगत यांनी सांगितले, की गॅस सिलिंडर पंतप्रधान उज्ज्वला योजना ही गरीब जनतेसाठी  असून ज्या घरात गॅस सिलिंडर पोहोचला नाही व जी जनता अजूनही अन्न शिजविण्यासाठी लाकडांचा उपयोग करते अशांसाठी ही योजना आहे.  केंद्र सरकारची पंतप्रधान  उज्ज्वला मोफत गॅस सिलिंडर ही योजना 2016 साली अंमलात आली.  गोव्यात या योजनेचा प्रारंभ लाटंबार्से पंचायतीतून होत  आहे. गोव्यातील बीपीएल कार्डधारकांनी आपापल्या ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधून योजनेचा लाभ घ्यावा.

माजी उपसरपंच बाबासाहेब राणे यांनी केलेल्या समाज कार्याबद्दल यांचा व  डिचोली भाजप मंडळाचे अध्यक्ष वल्लभ साळकर यांचाही मंत्री श्रीपाद नाईक यांच्याहस्ते शाल, श्रीफळ व समई भेट देऊन सत्कार करण्यात आला.  

दरम्यान, बर्वे पॅथोलॉजी क्‍लिनिकचे अमोल बर्वे यांनी महिलांसाठी मधुमेह व रक्तदाब तपासणीचे शिबिर घेतले. या आरोग्य शिबिरात परिसरातील सुमारे  70 महिलांनी   भाग घेऊन आपली  तपासणी करून घेतली. अतुल कामत यांनी सूत्रसंचालन केले व त्यांनीच आभार मानले.