Sun, Aug 18, 2019 14:56होमपेज › Goa › मंत्री सरदेसाईंनी लोकांची फसवणूक करू नये

मंत्री सरदेसाईंनी लोकांची फसवणूक करू नये

Published On: May 30 2018 2:17AM | Last Updated: May 29 2018 11:11PMपणजी : प्रतिनिधी

खाणप्रश्‍नी तोडग्यावरून भाजपला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देणार नसल्याचे मंत्री विजय सरदेसाईंचे विधान म्हणजे प्रादेशिक आराखडा, पीडीए सारख्या  महत्वाच्या विषयांवरुन जनतेचे लक्ष अन्यत्र वळवण्याचा  प्रयत्न होय. मंत्री विजय सरदेसाई यांनी जनतेची फसवणूक करू नये, अशी  टीका काँग्रेसचे प्रवक्‍ते सिद्धनाथ बुयांव यांनी पत्रकार परिषदेत केली.खाणींबाबत वटहुकूम जारी न केल्यास युती सरकारमधून गोवा फॉरवर्डने  बाहेर पडावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 

बुयांव म्हणाले की, राज्यातील भाजप तसेच सरकारमधील घटकपक्षातील नेते खाणींबाबत दरवेळी वेगवेगळी विधाने करीत आहेत. खाण प्रश्‍नी तोडगा न काढल्यास भाजपला लोकसभा निवडणुकीत पाठिंबा देणार नसल्याचे सरदेसाईंनी म्हटले होते. 25 मे रोजी  भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी खाणींसंदर्भात वटहुकूम जारी करणार नसल्याचे सांगितले. तर  26 मे रोजी भाजपचेच केंद्रीय आयुष  मंत्री श्रीपाद नाईक यांनी न्यायालयाकडून खाणींबाबत दिलासा न मिळाल्यास   वटहुकूम जारी केला जाईल, असे म्हटले होते. जनतेने नक्‍की कुणावर विश्‍वास ठेवावा, असा प्रश्‍नही बुयांव यानी उपस्थित केला. 
मंत्री सरदेसाई   खाणींबाबत गंभीर असते तर ते सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत दिल्लीला का गेले नाहीत, असा प्रश्‍न बुयांव यांनी उपस्थित केला. 

खाणबंदीचा बाजारावर परिणाम

खाणी बंद झाल्याने बाजारपेठेवर परिणाम जाणवत  आहे. खाणअवलंबितांसमोर उपविजिकेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. खाणप्रश्‍नी विविध विधाने करून सरकारने जनतेची फसवणूक करू नये, अशी टीका सिद्धनाथ बुयांव यांनी केली.