Wed, Aug 21, 2019 02:21होमपेज › Goa › राज्यातील वीज समस्या लवकरच सोडवू

राज्यातील वीज समस्या लवकरच सोडवू

Published On: Dec 04 2017 1:38AM | Last Updated: Dec 03 2017 11:05PM

बुकमार्क करा

डिचोली : प्रतिनिधी

राज्यात विजेपासून कोणी वंचित राहू नये यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्र्याच्या सहकार्याने राज्यातील सर्व वीज समस्या लवकरच सोडविल्या जातील, असे आश्‍वासन वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांनी दिले.

साखळी परिसरातील वीज समस्या सोडविण्यासाठी रविवारी सकाळी साखळी रवींद्र भवनात आयोजित केलेल्या बैठकीत मंत्री मडकईकर बोलत होते. बैठकीला सभापती डॉ. प्रमोद सावंत, सुर्ल सरपंच भोला खोडगिणकर, हरवळे सरपंच सागर मळीक, न्हावेली सरपंच मनाली गावस, आमोणा सरपंच संदेश नाईक,  भाजप मंडळ अध्यक्ष प्रदीप गावडे, नगरसेवक उपेंद्र कर्पे, दयानंद बोर्येकर,  वेळगे सरपंच केदार घाडी, सुर्ल  उपसरपंच विनिता घाडी, वीज खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री मडकईकर म्हणाले, की राज्यात अनेक वीजखांब मोडकळीस आले असून ते बदलण्याची मागणी पंचायत मंडळ, नगरपालिका कडून आली असल्याने प्रत्येक आमदाराला पन्नास वीज खांब देण्यात येणार आहेत. तसेच शहर व  ग्रामिण भागात धोकादायक असलेल्या वीज वाहिन्यांची तक्रार आल्यास अधिकार्‍यांकडून  पाहणी करून त्या बदलण्यात येतील.

बहुतेक ठिकाणी एलईडी पथदीप बसविण्यात आले असून अजून काही ठिकाणांचे काम बाकी आहे.  पथदीप बसविण्याचे कंत्राट खाजगी कंपनीला दिले असून दुरूस्तीचे काम खात्याचे कर्मचारी करतील असे त्यांनी सांगितले.

साखळी मतदारसंघात मोठी अशी वीजेची समस्या  असल्याचे बैठकीत   कोणी सांगितले नाही. ज्या काही लहान लहान समस्या आहेत त्या लवकरच सोडविण्यात येतील,  असे  आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.