Sun, May 26, 2019 19:05होमपेज › Goa › शॅक्सवाटप 15 पर्यंत पूर्ण करा : पर्यटनमंत्री

शॅक्सवाटप 15 पर्यंत पूर्ण करा : पर्यटनमंत्री

Published On: Sep 05 2018 2:13AM | Last Updated: Sep 05 2018 12:00AMपणजी : प्रतिनिधी

गोव्यात चार्टर फ्लाईट ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणार आहेत. त्याआधी राज्यातील शॅक चालकांना 2018-19 च्या पर्यटन हंगामासाठीची शॅक वाटपासंबंधी आवश्यक प्रक्रिया 15 सप्टेंबर 2018 पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना पर्यटन विभागाला दिल्या असल्याचे पर्यटन मंत्री मनोहर आजगावकर यांनी मंगळवारी सांगितले.

नवा हंगाम  जवळ येऊन ठेपलेला असल्यामुळे व्यवसायात दिरंगाई होऊ नये यासाठी शॅक्स चालकांनी सरकारला शॅक वितरणाची प्रक्रिया जलद करण्याची विनंती केली होती. त्यानुसार आजगांवकर यांनी त्यांना दिलासा देत पर्यटन विभागाला नव्या हंगामासाठीच्या परवाना वितरण प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करण्याच्या सूचना दिल्याचे सांगण्यात आले. 

गेल्या हंगामाप्रमाणे 2018- 19 मधील शॅक्स वितरण प्रक्रिया वेळेत पूर्ण केली जाईल, त्यामुळे शॅक चालकांना त्यांचे युनिट स्थापन करून व्यवसाय सुरू करता येईल. शॅक वितरणाची संपूर्ण प्रक्रिया पर्यटन हंगाम सुरू होण्यापूर्वी वेळेवर पूर्ण करण्याच्या सूचना आपण पर्यटन विभागाला दिल्या आहेत. शॅक वितरणाची संपूर्ण प्रक्रिया निर्धारित  वेळेत होणार, असे आजगावकर यांनी मंगळवारी प्रसारित केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

गोव्यातील शॅक चालकांनी शॅकचे वितरण झाल्यानंतर आवश्यक ते सर्व नियम पाळावेत, पर्यटकांमध्ये सुरक्षा, स्वच्छता, घनकचर्‍याची विल्हेवाट आणि राज्यातील कायद्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही आजगावकर यांनी शॅक व्यावसायिकांना केले.