Tue, Apr 23, 2019 07:56होमपेज › Goa › मंत्री मडकईकरांची प्रकृती स्थिर 

मंत्री मडकईकरांची प्रकृती स्थिर 

Published On: Jun 07 2018 2:04AM | Last Updated: Jun 07 2018 12:51AMपणजी : प्रतिनिधी

‘ब्रेन स्ट्रोक’ आल्यानंतर मुंबईतील कोकिळाबेन धीरूभाई अंबानी इस्पितळात उपचार घेत असलेल्या वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांची प्रकृती स्थिर  असून  ‘आयसीयू’ विभागातील डॉक्टरांनी अजूनही धोका टळला नसल्याचे स्पष्ट केले आहे. शस्त्रक्रिया केल्यापासून 72 तासानंतर पुढील उपचारांची दिशा निश्‍चित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बुधवारी सकाळी मडकईकर यांचे एमआरआय स्कॅनिंग करण्यात आले.

वीज मंत्री मडकईकर  सोमवारी गोव्याहून संध्याकाळी मुंबईला गेले असता त्यांना त्याच रात्री हॉटेलात अस्वस्थ वाटू  लागले. त्यामुळे हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी त्यांना कोकिळाबेन इस्पितळात दाखल केल्यानंतर त्यांच्या मेंदूतील रक्‍तवाहिन्यात गुठळ्या झाल्याचे निष्पन्न झाले. मडकईकर यांच्यावर शस्त्रक्रिया केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाल्याने डॉक्टरांनी समाधान व्यक्‍त केले आहे. बुधवारी सकाळी त्यांचा एमआरआय स्कॅनिंग करण्यात आले. मात्र,  मंगळवारपासून 72 तास त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली असून त्यानंतरच पुढील उपचार करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

मडकईकर यांच्यासोबत त्यांची पत्नी जेनिता, मुलगी, बंधू धाकू व अन्य कुटुंबीय आहेत. आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे मंगळवारी सकाळी गोेमेकॉचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. शिवानंद बांदेकर यांना सोबत घेऊन मुंबईला पोहोचले. सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर, कला व सांस्कृतिक मंत्री गोविंद गावडे,  खासदार विनय तेंडूलकर, भाजप सरचिटणीस सदानंद तानावडे तसेच मडकईकर यांच्या निकटवर्तियांनी  इस्पितळात जाऊन त्यांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली.