Tue, Jul 16, 2019 11:36होमपेज › Goa › गोवा : मंत्री, आमदारांच्या वेतन, भत्त्यात 77 टक्के वाढीचा प्रस्ताव

गोवा : मंत्री, आमदारांच्या वेतन, भत्त्यात 77 टक्के वाढीचा प्रस्ताव

Published On: Aug 03 2018 1:34AM | Last Updated: Aug 03 2018 1:34AMपणजी : प्रतिनिधी 

राज्यातील सर्व मंत्री, आमदारांना वेतन आणि भत्त्यात 77 टक्के वाढ देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने आणला आहे. या विषयीच्या दोन प्रस्तावांना मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली असून विधानसभेत सदर विधेयक  शुक्रवारी चर्चेला येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मंत्र्यांचे वेतन व भत्ता कायदा - 1964 मधील कलम-3 आणि 4 मध्ये दुरुस्ती करण्यास मान्यता दिली आहे. तसेच विधानसभा सदस्य वेतन, भत्ता आणि पेन्शन कायदा-2004 च्या कलम-3,9 आणि 11 मध्ये दुरुस्ती केली आहे. या दोन्ही दुरुस्तीमुळे सरकारवर वर्षाला अतिरिक्‍त सुमारे 7.25 कोटी रुपये बोजा पडणार आहे. वाढत्या महागाईमुळे आमदार, मंत्र्यांच्या वेतनात वाढ करण्याची आवश्यकता असल्याचे या प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. 
आमदारांना महिन्याला सध्या 10 हजार रुपये वेतन, 90 हजार रुपये मतदारसंघ भत्ता आणि राज्याबाहेर गेल्यास प्रवास व निवास भत्ता म्हणून प्रतिदिन 6 हजार रुपये असा आर्थिक लाभ मिळत आहे.  यात वेतन व भत्त्यात सुमारे 77 टक्के अशी भरघोस वाढ देण्याचा प्रस्ताव असून मंत्र्यांचे मासिक वेतन किमान 2.15 लाख, आमदारांचे 1.70 लाख रूपये होणार आहे. विधानसभा सत्र सुरू असताना सर्व आमदारांना मिळत असलेला दर दिवसांचा भत्ता 2 हजार रूपये आहे. अधिवेशनाच्या कालावधीत निवास भत्ता दिड हजार वरून तीन हजार रूपये, प्रवास भत्ता म्हणून 6 हजार रूपयांवरून 7,500 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. 

मंत्र्यांना 18 हजार रूपये वेतन, 90 हजार मतदारसंघ भत्ता, मासिक भत्ता 15 हजार रूपये असे एकूण 1.23 लाख रूपये मिळत होते. या भत्त्यात 77 टक्के वाढ होऊन 2.15 लाख रूपयांपर्यंत जाणार आहे. मंत्री शासकीय बंगल्याचा वापर करत नसेल तर त्यांना 20 हजार रूपये निवास भत्ता मिळतो. 

मुख्यमंत्र्यांचे दर महिना वेतन 20 हजार रूपये, 90 हजार मतदारसंघ भत्ता  आणि बंगल्यासाठी भत्ता नसला तरी अतिरिक्त 25 हजार भत्ताही मिळतो. या सर्व वेतनात वाढ होऊन 2.30 लाख रूपये होणार आहे. सभापती आणि विरोधी पक्षनेत्यांचेही वेतन मुख्यमंत्र्यांच्या बरोबरीनेच असणार आहे.