Sun, Jul 21, 2019 16:40
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › विकासकामांच्या दर्जाशी तडजोड नाही

विकासकामांच्या दर्जाशी तडजोड नाही

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 24 2018 11:57PMहळदोणे : वार्ताहर

विकासकामांच्या दर्जाशी  कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ग्रामीण विकास संस्थेअंतर्गत करण्यात येणार्‍या विकासकामांचा  दर्जा चांगला राखण्यात येणार आहे,  असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर  यांनी केले.

हळदोणे मतदारसंघातील बस्तोडा येथे ग्रामीण विकास संस्थेअंतर्गत बांधलेल्या सत्पुरूष  बांदेश्‍वर देवस्थानाच्या सभामंडप  उद्घाटन प्रसंगी मंत्री साळगावकर बोलत होते. व्यासपीठावर आमदार ग्लेन टिकलो, बस्तोडा सरपंच सावियो मार्टीन्स, उपसरपंच मनिषा नाईक, पंचायत सदस्य प्रतिक्षा मयेकर, सुनिता लोटलीकर, राजेश पिरणकर, राजेंद्र नारोजी, देवस्थान समितीचे पदाधिकारी व  झांटये  कुटुंबीय  उपस्थित होते. 

मंत्री साळगावकर म्हणाले, की  आमदार ग्लेन टिकलो हे जनतेला दिलेली आश्‍वासने पूर्ण करण्यात यशस्वी ठरले आहेत.  त्यांनी आपल्या मतदारसंघात  अनेक विकास कामे पूर्ण केली असून काही कामे चालू आहेत ती देखील लवकरच पूर्ण होतील.

सत्पुरूष देवस्थानाच्या सभामंडपाचे उर्वरित  काम ग्रामीण विकास संस्थेअंतर्गत लवकरच पूर्ण करण्यात येईल,असे आश्‍वासन मंत्री  साळगावकर यांनी दिले. सरपंच सावियो मार्टीन्स म्हणाले, की मतदारसंघातील भाजप विरोधक विकासकामांचे श्रेय घेऊन खोटा प्रचार करीत आहेत. विकास कामे करण्यासाठी सरकारी कचेर्‍यातून सर्व कार्यालयीन  कामकाम पूर्ण करून मंजुरी घेण्यासाठी बराच अवधी लागतो. मात्र विकास कामे  पूर्ण झाल्यानंतर विरोधक  लोकांची दिशाभूल करतात. जनतेने अशा प्रचाराला बळी पडू नये.  

आमदार ग्लेन टिकलो यांनी  हळदोणे  मतदारसंघात केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. मतदारांनी हळदोणे मतदारसंघातून आपणाला दुसर्‍यावेळी निवडून दिल्यामुळे त्यांच्या विकासकामांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.  त्या पूर्ण करण्यासाठी  आपण प्रयत्न करीत असून  लोकांच्या सहकार्याची गरज आहे. सत्पुरूष बांदेश्‍वर देवस्थानच्या सभामंडपासाठी जागा दिलेल्या झांटये परिवाराचा  मंत्री जयेश साळगावकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

नारायण कारापूरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.  पंचायत सदस्य रणजीत उसगावकर यांनी आभार मानले.