होमपेज › Goa › ग्रामीण विद्यार्थ्यांना संघर्षातून यश  

ग्रामीण विद्यार्थ्यांना संघर्षातून यश  

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 29 2017 12:31AM

बुकमार्क करा
 कुंभारजुवे : प्रतिनिधी

शहरी भागातील विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध असतात. याउलट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मनाजोगत्या सुविधा मिळत नाहीत. मात्र तरीही संघर्षातून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली  चांगले यश मिळवितात,  असे प्रतिपादन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी केले. 

भोम येथील महानंदू  नाईक मेमोरियल हायस्कूलच्या  स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण प्रसंगी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून  मंत्री  गावडे  बोलत होते. व्यासपीठावर भोम सरपंच सुनील भोमकर, उपसरपंच शैलेश नाईक, पंचायत सदस्य विश्‍वजीत नाईक,  हायस्कूल व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्याम नाईक, खजिनदार महाबळेश्‍वर गावकर, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष रोहिदास नाईक, पूर्वप्राथमिक विभाग अध्यक्ष शिल्पा नाईक,  मुख्याध्यापक दामोदर फडते आदी  उपस्थित होते. 

पालक-शिक्षक व व्यवस्थापक यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी  काम करावे. हे हायस्कूल आमच्या गावासाठी आहे. इथेच शिकून या गावचे विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठे झाले आहेत याचा आम्हाला अभिमान आहे, असे  सुनील भोमकर यांनी सांगितले. 

येथील शिक्षकांच्या अथक प्रयत्नाने या हायस्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागतो. ही भूषणावह बाब आहे. ग्रामीण विद्यार्थी शिक्षणात कुठेच कमी पडत नाहीत. तरी भविष्यात अधिक यश संपादन करण्यासाठी परिश्रम करीत राहीले पाहिजे,  असे  श्याम नाईक यांनी सांगितले.

हायस्कूलचे दिवंगत व्यवस्थापक रायू डी. नाईक यांना एक मिनिट शांतता पाळून  श्रद्धांजली वाहण्यात आली.विश्‍वजीत नाईक यांचे भाषण झाले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली. मेधा देसाई यांनी सूत्रसंचालन केले. सारंगी बोरकर यांनी अहवाल वाचन केले.  रोहिदास नाईक यांनी मानले. यानंतर विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला.