Fri, Jul 19, 2019 07:04होमपेज › Goa › मांड संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी अर्थसहाय्य   

मांड संस्कृतीच्या पुनरुज्जीवनासाठी अर्थसहाय्य   

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 12:22AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील मांड संस्कृती सध्या लोप पावण्याच्या मार्गावर असून, तिच्या पुनरुज्जीवनासाठी कला व संस्कृती संचालनालयातर्फे अर्थसहाय्य योजना राबवण्यात  येणार आहे. या योजनेची  येत्या एप्रिलपासून अंमलबजावणी होणार आहे, अशी माहिती कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मंत्री गावडे म्हणाले, राज्यातील जागोर, घोडेमोडणी, कालो, तालगडी, तोणयामेळ, शिगमो, नमन, गोफ, धालो यासारख्या कला प्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी युवकांकरिता उपक्रम राबवण्यात येईल. गावागावांत पारंपरिक संस्कृतीसंदर्भात जाणकार व तज्ज्ञ असलेल्या ‘मांड गुरूं’ना या उपक्रमासाठी निवडले जाईल व गुरूंसोबत एक सहाय्यकही नेमण्यात येणार आहे. ज्या मुलांना हे पारंपरिक मांड प्रकार शिकायचे असतील, त्यांना ‘मांड गुरू’ गावातील एका ठिकाणी जमवून शिकवणी देतील. या योजनेंतर्गत ‘मांड गुरूं’ना दरमहा 9 हजार रुपये, तर गुरूंसोबत शिकवणार्‍या सहायकाला 6 हजार रुपये मानधन दिले जाईल. शिकण्यासाठी येणार्‍या मुलांना दीड हजार रुपये दरमहा विद्यावेतन देण्यात येईल. 

मुलांना शिकण्यासाठी लागणारी वाद्ये व अन्य वस्तूंसाठीदेखील संचालनालयातर्फे 50 हजार रुपये, तर या वाद्यांच्या देखभालीसाठी अधिक 40 हजार रुपये प्रत्येक मांड गुरूंच्या गटाला सहाय्यधन म्हणून पुरविण्यात येतील. हे पारंपरिक नाट्य-नृत्य प्रकार सादर करण्यासाठी लागणार्‍या वस्त्रांसाठीही 60 हजार रुपये निधी देण्याची तरतूद केली आहे. तसेच मांड शिकविण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या जागेच्या देखभालीसाठीही 25 हजार रुपये देण्यात येणार आहेत. प्रत्येक मांडमध्ये पाच प्रकार शिकविले जातील, असेही त्यांनी सांगितले.   

यंदा अडीच हजार मुलांपर्यंत  पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार असून यासाठीचे अर्ज 1 एप्रिल पासून संचालनालयाच्या कार्यालयात उपलब्ध असतील. प्रत्येक मांडावर 4 लाख रुपयांपर्यंत खर्च करण्याचा विचार आहे. मांड संस्कृती रुजविण्यासाठी गावातील ज्येष्ठ व्यक्तींची मदत घेतली जाईल. यासंदर्भात कुणाला काही सुचवायचे असल्यास आम्ही सूचनांच्या स्वागतासाठी तयार आहोत, असेही मंत्री गावडे यांनी सांगितले.    

पत्रकार परिषदेत संचालनालयाचे संचालक  गुरूदास पिळर्णकर उपस्थित होते.