Thu, Jun 20, 2019 00:30होमपेज › Goa › खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणार

खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणार

Published On: Jan 08 2018 1:13AM | Last Updated: Jan 08 2018 12:12AM

बुकमार्क करा
मडगाव : प्रतिनीधी

युवकांनी सर्वांगीण विकासासाठी अभ्यासाबरोबर मैदानी खेळ  खेळणे आवश्यक आहे.  युवकांना खेळासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देणे अत्यंत गरजेचे आहे.  सरकार  त्या सोयी सुविधा देण्यास   प्रयत्नशील आहे, असेे प्रतिपादन नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी केले.

फातोर्डा  येथे  डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाला चार कोटी रुपये खर्च करून बांधून देण्यात आलेल्या क्रीडा मैदानाच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री  फ्रान्सिस डिसोझा बोलत होते. त्यांच्या हस्ते क्रीडा मैदानाचे उद्घाटन  करण्यात आले.  नगर नियोजनमंत्री विजय सरदेसाई, मडगाव नगराध्यक्षा बबिता आंगले, फादर फेलिक्स  फर्नांडिस, सुडाचे उपाध्यक्ष संदीप फळारी, सुडाचे अभियंता जगदीश उस्मनी, उपनागराध्यक्ष टिटो कार्दोज, नगरसेवक पूजा नाईक  उपस्थित होत्या.

मंत्री डिसोझा म्हणाले, की आपणास  प्रसिद्धीची आवश्यकता नाही. मैदान लोकांसाठी असून आपल्या अनुपस्थितीत  त्याचे उद्घाटन करावे असे  सरदेसाई यांना सांगितले  होते.  आपण उपचार घेण्यासाठी विदेशात गेलो होतो.चार महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज प्रथमच  समारंभासाठी बाहेर पडलो आहे. आजचा क्रीडा मैदान  उद्घाटनाचा दिवस आपल्यासाठी अत्यंत गर्वाचा  आहे.

अनेक वेळा सरकारी कामे लोकांना मान्य होत नाहीत.  फातोर्डातील डॉन बॉस्कोच्या  क्रीडा मैदानाचे  काम लोकांना आवडले याचे  आपणास समाधान वाटले. आपल्या खात्याला  साठ कोटी  रुपयांची तरतूद असून चौदा पालिकांसाठी हा निधी खर्च करावयाचा आहे. क्रीडा खात्यावर  निधीचा जास्त भार नको म्हणून हा प्रकल्प हाती घेतला आणि वेळेत पूर्ण झाला, असे  मंत्री डिसोझा म्हणाले.

मंत्री विजय सरदेसाई  म्हणाले, की  सरकारी प्रकल्प लवकर होत नाहीत.  पण हा प्रकल्प मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या  प्रयत्नांमुळे वेळेत पूर्ण झाला.  गोमंतकीयांच्या रक्तात फुटबॉल आहे, पण खेळायला मैदान नाही.गोयकारपण हा गोवा फॉरवर्डचा नारा आहे आणि म्हणूनच  आम्ही या मैदानाला प्राधान्य दिले.

सागची अनेक मैदाने आहेत पण गोमंतकीयांना ही मैदाने मिळत नाहीत. सागचे अधिकारी मैदानाला कुलूप लावून पळ काढतात. फातोर्ड्यात मैदान  असून तिथे युवकांना  खेळायला मिळत नाही, अशी अवस्था आहे.  डॉन बॉस्कोच्या व्यवस्थापनाने फातोर्डावासियांसाठी  हे मैदान उपलब्ध करून घ्यावे. मंत्री  फ्रान्सिस डिसोझा यांचा हा मतदारसंघ नसूनसुद्धा त्यांनी प्राधान्याने हे मैदान बांधून दिल्याबद्दल  त्यांचे आभार मानतो, असे मंत्री सरदेसाई  म्हणाले. 

नगराध्यक्ष   आंगले  म्हणाल्या, की   मंत्री विजय सरदेसाई आणि  मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी प्रयत्न करून प्राधान्याने हे काम हाती घेतल्यामुळे डॉन बॉस्को अभियांत्रिकी महाविद्यालयाला  हे मैदान कमी अवधीत प्राप्त झाले. महाविद्यालय व्यवस्थापनाने  नवीन खेळाडू तयार होण्यासाठी सर्वांना या मैदानावर खेळण्यास मुभा द्यावी.