Tue, Apr 23, 2019 10:23होमपेज › Goa › सिक्वेरांच्या पुतळा उभारणीवर योग्य वेळी मत मांडू : ढवळीकर

सिक्वेरांच्या पुतळा उभारणीवर योग्य वेळी मत मांडू : ढवळीकर

Published On: Feb 07 2018 1:37AM | Last Updated: Feb 07 2018 12:04AMपर्वरी : वार्ताहर

पर्वरी येथे विधानसभा संकुलात डॉ. जॅक सिक्केरा यांचा पुतळा उभारण्याबाबत योग्य वेळी मत व्यक्त  करू, असे  सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनी नुकतेच पत्रकारांशी बोलताना  सांगितले.

राज्यात सध्या डॉ. जॅक सिक्केरा यांचा पुतळा उभारण्याचा विषय गाजत आहे. भाजपने पर्वरी येथे विधानसभा संकुलात आणखी पुतळा उभारण्यास विरोध केलेला असून भाजपचे आमदार तथा उपसभापती मायकल लोबो यांनी विधानसभा संकुलात पुतळा उभारण्याबाबत खासगी ठराव विधानसभेत सादर केला आहे. नगर नियोजन मंत्री विजय सरदेसाई यांच्याकडून सिक्केरांच्या पुतळ्याचा विषय रेटला जात आहे. कॉँग्रेस विधिमंडळ गटाने पुतळा उभारण्याबाबत खासगी ठराव दाखल करण्याचे ठरविले आहे. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे आमदार चर्चिल आलेमाव यांनीही पुतळा उभारण्यासाठी समर्थन देण्याचा निर्णय घेतला आहे.

मंत्री ढवळीकर म्हणाले की, मगोपचे पर्वरी येथील नवीन पुतळा प्रकरणी धोरण निश्चित आहे. पर्वरी येथे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचा पुतळा उभारताना या ठिकाणी अन्य कुणाचाही पुतळा न उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असेही  मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.

सभापतींना पुतळ्याबाबतच्या खासगी ठरावावर निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहेत. त्यावर आपण भाष्य करणार नाही,असे सांगून ढवळीकर म्हणाले, गोव्याचा मुक्तीलढा, जनमत कौल यात सहभागी स्वातंत्र्यसैनिक व अन्य व्यक्तींचे पुतळे उभारण्यासाठी दोन लाख चौरस मीटर जागेत मोठे उद्यान तयार करावे. या उद्यानाला टी. बी. कुन्हा, डॉ. मिनेझिस, राम मनोहर लोहिया यांचे नाव द्यावे. या ठिकाणी स्वातंत्र्य लढा, जनमत कौल व राज्याच्या विकासासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे पुतळे उभारावेत, असेही त्यांनी सांगितले.