Wed, Mar 20, 2019 02:34होमपेज › Goa › महिलांचे भाजपसाठी उल्‍लेखनीय कार्य

महिलांचे भाजपसाठी उल्‍लेखनीय कार्य

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 12:18AMबार्देश : प्रतिनिधी

राज्याच्या विकासासाठी भाजप सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. भाजप पक्ष सत्तेवर येण्यासाठी महिलांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांचे हे कार्य कधी न विसरण्यासारखे आहे, असे प्रतिपादन नगरविकासंमत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी केले. 

म्हापसा येथील कोमुनिदाद सभागृहामध्ये भाजपतर्फे उत्तर गोव्यातील महिलांसाठी आयोजित केलेल्या महिला मेळाव्यात मंत्री अ‍ॅड. डिसोझा बोलत होते. व्यासपीठावर केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, पक्षाध्यक्ष तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे, मुंबईतील भाजपच्या आमदार मनिषा चौधरी, माजी आमदार सदानंद शेट तानावडे, उत्तर गोवा महिला मोर्चाच्या अध्यक्षा सुलक्षणा सावंत, उपाध्यक्षा डिलायला लोबो, सरचिटणीस सपना मापारी, मेधा परूळेकर, कुंदा चोडणकर उपस्थित होत्या. 

मनिषा चौधरी म्हणाल्या, की भारत हा पुरूषप्रधान देश असला तरी 365 दिवसही महिला या जास्त काम करत असतात. स्त्रीशक्‍ती नसती तर विश्‍व चालले नसते. देशाला इंदिरा गांधींसारख्या पंतप्रधान तर प्रतिभा पाटीलसारख्या राष्ट्रपती मिळाल्या. आपल्याकडे आत्मविश्‍वास हवा. राजकारणात व समाजकारणात पुढे यायचे असल्यास विश्‍वासाने काम करण्याची गरज आहे. केंद्र सरकार आपल्यासाठी खूप काम करत आहे. 

विनय तेंडुलकर म्हणाले, की  महिलामध्ये काम करण्याची ताकद आहे. त्यामुळे त्यांच्या सहकार्याने आम्ही कामे करू शकतो. महिलांसाठी 33 टक्के आरक्षण व्हावे, अशी भाजपची इच्छा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी  आमचा प्रयत्न आहे.  गोव्याच्या अनेक मतदारसंघात महिला   चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. पक्षावर महिलांचे प्रेम असून त्यांच्या सहकार्याने पक्ष पुढे जात आहे.

मंत्री विश्‍वजित राणे म्हणाले,  की  भाजपने महिलांसाठी खूप काही केले आहे. गृहलक्ष्मी, लाडली लक्ष्मीसारख्या योजना सुरू केल्या आहेत. दरवर्षाला महिला स्वयंसहाय्य गटांना सरकारकडून 25 हजार रुपये कार्यक्रम करण्यासाठी देण्यात येतील. महिला ही एक ताकद आहे. त्यांच्यासाठी 181 ही हेल्पलाईन सुरू करण्यात येणार आहे. 

अंगणवाडीची स्थिती आज व्यवस्थित नाही. त्यांना अनेक सुविधांची गरज आहे. मुलांना स्वच्छतागृह नाही. काही अंगणवाडी या भाड्याच्या खोलीत चालतात. त्या सुधारण्यासाठी सरकारने 15 कोटी रुपये खर्च करून शंभर ते दिडशे सुसज्ज अशा अंगणवाड्या बांधल्या जाणार आहेत, असे आश्‍वासन मंत्री राणे यांनी दिले.

बांबोळी इस्पितळात 50 कोटींचा कर्करोग कक्ष सुरू करणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सर्व तर्‍हेने विचार करणारे एकमेव मुख्यमंत्री गोव्याला लाभल्याचे मंत्री राणे  म्हणाले. मंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते   महिला मेळाव्याचे उद्घाटन  करण्यात आले.  शितल नाईक यांनी  सूत्रसंचालन केले व तीनेच आभार मानले.