Sun, Aug 25, 2019 08:56होमपेज › Goa › कामतांकडून उडवाउडवीची उत्तरे 

कामतांकडून उडवाउडवीची उत्तरे 

Published On: Dec 02 2017 12:25AM | Last Updated: Dec 02 2017 12:24AM

बुकमार्क करा

पणजी : प्रतिनिधी

खाण घोटाळाप्रकरणी आमदार दिगंबर कामत हे उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांची पोलिस कोठडीत चौकशी करण्याची गरज आहे, असा युक्तिवाद शुक्रवारी झालेल्या सुनावणीवेळी विशेष तपास पथकाने (एसआयटी) विशेष न्यायालयात  केला. 

पणजीतील विशेष न्यायालयात शुक्रवारी मुख्य 187  खाणींच्या लिजना परवानगी देण्याच्या घोटाळ्याप्रकरणी सरकारी पक्षाचा अपुरा राहिलेला युक्तिवाद पुन्हा सुरू करण्यात आला.  काही खाणींची मुदत 1988 साली संपली असता सरकारकडे या खाणींच्या नूतनीकरणासाठी 2000 साली अर्ज सादर केला होता. कामत यांनी मुख्यमंत्री तथा खाणमंत्री म्हणून ‘कन्डोनेशन डिले’चा  आपल्या विशेषाधिकारांतर्गत मुदत टळून गेलेल्या खाण  परवान्यांचे नूतनीकरण  करण्याचा आदेश दिला होता. या प्रकरणामुळे राज्याची  हानी  झाली  असून कोट्यवधीच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे न्यायालयात सरकारी पक्षातर्फे सांगण्यात आले. 

काही खाणींचे अधिकार तिसर्‍या व्यक्तीला हस्तांतरित  करण्यासाठीही कामत यांनी परवानगी दिली होती. या दोन्ही प्रकरणात काहीही प्रश्‍न विचारल्यास आपल्याला आठवत नसल्याचे सांगून कामत उत्तर देण्याचे टाळत असल्याचे एसआयटीचे वकील जे. डी. किर्तनी यांनी न्यायालयात स्पष्ट केले. सरकारची बाजू अजूनही अपुरी असल्याने न्यायालयाने 6 डिसेंबरला पुढील सुनावणी ठेवली आहे. 
राजकारणी प्रफुल्ल हेदे खाण नूतनीकरण प्रकरणाची सुनावणी 7 डिसेंबरला घेण्यात येणार आहे.