Sun, Aug 18, 2019 14:25होमपेज › Goa › गडकरी- तोमर यांनी भूमिका स्पष्ट करावी

गडकरी- तोमर यांनी भूमिका स्पष्ट करावी

Published On: Mar 10 2018 2:15AM | Last Updated: Mar 10 2018 2:14AMपणजी : प्रतिनिधी

खाण समस्येवर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारमधील सर्व घटक पक्षांनी एकत्रित बैठक घेऊन त्रिमंत्री  सल्लागार समितीसमोर तसेच मंत्रिमंडळासमोर ‘पथदर्शी आराखडा’ ठेवावा. तसेच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि खाण मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी गोव्यात येऊन गोमंतकीयांना आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उपसभापती तथा कळंगूटचे आमदार मायकल लोबो यांनी केली आहे. 

लोबो म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर येत्या 15 मार्चनंतर राज्यात खाण बंदी होणार असल्याने राज्यावर आर्थिक व सामाजिक संकट कोसळणार आहे. या गोंधळाच्या परिस्थितीत सामान्य जनतेने काय मार्ग अवलंबावा, लाखो लोकांवरील बेरोजगारीचे संकट कसे दूर होणार यावर केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन उपाययोजना करावी. येत्या 15 मार्चनंतर उद्भवणार्‍या परिस्थितीच्या विचाराने गोमंतकीय चिंताग्रस्त आहेत. गोव्यात भाजप आघाडी सरकार स्थापन करण्यास पुढाकार घेतलेले     

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी तथा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी पुन्हा राज्यात येऊन पुढील  संभाव्य स्थितीचा आढावा घ्यावा. खाणबंदीनंतर राज्यातील लोकांनी बेरोजगारीच्या स्थितीला कसे तोंड द्यावे यावर राज्याचे ‘एजी’ सरेश लोटलीकर यांनी कायदेशीर काही उपाय सुचवला आहे का, अथवा सल्ला दिला आहे का, हेही सरकारने स्पष्ट करावेे. केंद्रात तसेच राज्यात भाजप सरकार असूनही या खाण समस्येवर सर्वमान्य तोडगा न निघणे असंयुक्तीक आहे. जर राज्यातील लोकांवर कोसळणार्‍या संकटावर केंद्र सरकारकडून उपाय काढला जात नसेल, तर सर्व आमदारांनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे, असेही लोबो यांनी स्पष्ट केले.