होमपेज › Goa › खाणपट्ट्यात ट्रकांची धडधड आज थांबणार

खाणपट्ट्यात ट्रकांची धडधड आज थांबणार

Published On: Mar 15 2018 1:55AM | Last Updated: Mar 15 2018 1:55AMमडगाव : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार खाण कंपन्यांनी खाणींवरील सर्व साहित्य बाहेर काढले असून, गुरुवारी खाणीवरील सर्व व्यवहार बंद होणार आहे. गेले तीन महिने सुरू असलेली खनिजवाहू ट्रकांची धडधडसुद्धा आज, गुरुवारी संध्याकाळी थांबणार आहे.   कोडली सेझा गोवा वेदांता कंपनीचे व्यवस्थापक जोसेफ कोएलो यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले की, गुरुवारी संध्याकाळपासून खनिज वाहतूक सर्वोच्च न्यायालयाचा पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्यात येणार आहेे. लिज क्षेत्राच्या बाहेर असलेल्या खनिजाची वाहतूक चालूच ठेवण्यास सरकारने मुभा दिली असली तरी सांगे, केपे आणि धारबांदोडा तालुक्यातील एकाही खाणीची वाहतूक चालणार नाही, असे सूत्रांकडून समजते. 

खनिज वाहतूक गुरुवारी   संध्याकाळपर्यंत करणे शक्य असल्याने सावर्डे मतदारसंघातील कोडली आणि सांगे तालुक्यातील कावरे पिर्ला भागातून गेल्या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू करण्यात आली होती. खाण कंपन्यांनी कुडचडेच्या खामामळ तसेच सावर्डे, कापशे येथील जेटीवर खनिज माल साठवून ठेवला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

2013 साली आलेली खाण बंदी तब्बल तीन वर्षांनी उठली होती. या काळात लोकांनी आपला उदरनिर्वाह चालविण्यासाठी महाराष्ट्रात आणि कर्नाटकात ट्रक नेले होते. या व्यवहारात अनेकांची फसवणूकसुद्धा झाली होती. आता पुन्हा खाणबंदी आल्याने खाण परिसरातील हजारो कुटुंबांवर आभाळ कोसळले आहे.हॉटेल मालकांपासून ते टायर पंक्चर काढणार्‍यांनाही खाण बंदीची झळ बसणार आहेदोन दिवसात याचिका : प्रकाश राऊत देसाई दक्षिण गोवा ट्रक मालक संघटनेचे  अध्यक्ष प्रकाश राऊत देसाई यांनी ‘पुढारी’शी बोलताना सांगितले, की सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू असून कायदे तज्ज्ञांचा सल्ला घेऊन दोन दिवसांत याचिका दाखल केली जाईल.