Sun, May 26, 2019 20:39होमपेज › Goa › खाण अवलंबितांचे पुन्हा  पणजीत आंदोलन सुरू

खाण अवलंबितांचे पुन्हा  पणजीत आंदोलन सुरू

Published On: Aug 07 2018 12:59AM | Last Updated: Aug 06 2018 11:44PMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील खाणी पुन्हा सुरू करण्यासाठी जोपर्यंत ‘गोवा दमण व दीव मायनिंग कन्सेशन अ‍ॅबोलिशन अँड  रेग्युलेशन  अ‍ॅक्ट 1987’ या कायद्यात दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशारा देऊन खाण अवलंबितांनी सोमवारपासून पुन्हा एकदा आझाद मैदानावर धरणे आंदोलन  सुरू केले.

गोवा मायनिंग पिपल्स फ्रंटचे नेते पुती गावकर म्हणाले, राज्य विधानसभेचे पावसाळी अधिवेशन  19 जुलै ते  3 ऑगस्ट  या कालावधीत झाले. त्यामुळे या काळात पणजी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे अधिवेशन काळात खाण अवलंबितांनी आझाद मैदानावरील धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित केले होते. मात्र, आता  अधिवेशन संपुष्टात आल्याने खाण अवलंबितांनी आझाद मैदानावर पुन्हा आंदोलनास सुरुवात केली आहे.

खाण अवलंबितांनी सरकारने खाणी सुरू कराव्यात, या मागणीसाठी  11 जूनपासून धरणे आंदोलन सुरू केले होते, असेही गावकर यांनी सांगितले. या आंदोलनाला आता दोन महिने पूर्ण होणार आहेत. राज्यातील खाण व्यवसाय बंद झाल्याने त्या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांसमोर पेच निर्माण झाला आहे. खाण व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा, यासाठी ‘गोवा दमण व दीव मायनिंग कन्सेशन अ‍ॅबोलिशन अँड  रेग्युलेशन अ‍ॅक्ट 1987’ मध्ये दुरुस्ती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे मागणी करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे दिल्‍लीत सदर मागणीसंदर्भात चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री पर्रीकर यांच्या दौर्‍यानंतरच आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचेही गावकर यांनी सांगितले.