Wed, Jul 17, 2019 18:29होमपेज › Goa › खाणबंदी, ड्रग्जवरून सरकारला घेरणार 

खाणबंदी, ड्रग्जवरून सरकारला घेरणार 

Published On: Jul 04 2018 2:12AM | Last Updated: Jul 03 2018 11:48PMपणजी : प्रतिनिधी

राज्य विधानसभेच्या येत्या पावसाळी अधिवेशनात सीआरझेड, खाणबंदी, ड्रग्ज, प्रादेशिक आराखडा, मोपा विमानतळ, विकासकामे, रोजगार आदी विविध प्रश्‍नांवरून सरकारला घेरण्याचे काँग्रेस विधिमंडळ गटाने ठरविले आहे. काँग्रेसच्या सर्व आमदारांनी अधिवेशनात कोणते प्रश्‍न व भूमिका मांडायची, याबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. विरोधी पक्ष म्हणून एकत्रितरित्या सरकारचे अपयश उघड करण्याची रणनीती आखण्यात आल्याची माहिती विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

येत्या 19 जुलैपासून सुरू होणार्‍या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारची कोंडी करण्यासाठी रणनीती निश्‍चित करण्यासाठी मंगळवारी संध्याकाळी पर्वरी येथील विरोधी पक्षनेत्यांच्या कक्षात विधिमंडळ गटाची बैठक घेण्यात आली. सरकारची खालावलेली कामगिरी आणि चुका सभागृहात उघड करण्याचे धोरण अवलंबण्याचे ठरविण्यात आले, असे कवळेकर यांनी  सांगितले.  भाजपप्रणीत आघाडी सरकार सत्तेवर येऊन 15 महिन्यांहून अधिक काळ लोटला तरी जनहिताचे अनेक प्रश्‍न व समस्या सोडवण्यास सरकार अपयशी ठरले आहे. गेली साडेसहा   वर्षे राज्यात भाजपचे सरकार असूनही अनेक विषयांवर अजूनही तोडगा काढण्यात भाजप नेत्यांना अपयश आले आहे, असे सांगून मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्र्याने आपापल्या खात्यातील जनतेच्या प्रश्‍नांवर काय तोडगा काढला, याचा त्यांना जाब विचारणार  असल्याचे कवळेकर म्हणाले. 

सभापती डॉ. प्रमोद सावंत यांना अधिवेशनाचा कालावधी 12 दिवसांवरून 18 दिवसांपर्यंत न वाढवल्याबद्दलही विचारणा केली जाणार आहे. याविषयी देण्यात आलेल्या निवेदनाबाबत अजूनही सभापती कार्यालयाकडून कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही. यामुळे सभागृह कामकाज समितीच्या बैठकीत हा प्रश्‍न मांडला जाणार असल्याचे कवळेकर यांनी सांगितलेे. विरोधी आमदारांच्या प्रत्येक मतदारसंघात 18 कोटी रुपयांची विकासकामे करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी  देऊनही एकाही विकासकामाची फाईल मंजूर करण्यात आलेली नाही. याविषयीही सरकारला अधिवेशनात धारेवर धरले जाणार असल्याचे कवळेकर म्हणाले. 

‘कटामाईन’ विषय लक्षवेधी 

पिसुर्ले-सत्तरी येथे एका भाजप पदाधिकार्‍याच्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेल्या ‘केटामाईन’च्या विषयावर सरकारला कात्रीत पकडण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांनी  केटामाईनसंबंधी लक्षवेधी सूचना मांडली आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांनी दिली.