होमपेज › Goa › खनिज उत्खनन 15 पर्यंत

खनिज उत्खनन 15 पर्यंत

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 12:30AMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील खाणीत लोह खनिजाचे उत्खनन ‘आयबीएम’च्या (इंडियन ब्युरो ऑफ माईन्स)अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली 15 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजेपर्यंत करता येईल, असे सुधारित निर्देेश खाण खात्याचे संचालक प्रसन्‍न आचार्य यांनी सोमवारी (दि. 12) जारी केले. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील 88 खाण लिजेस रद्दबातल ठरवून 15 मार्चपासून उत्खनन बंद करण्याचे आदेश दिल्यानंतर 13 मार्चपासून उत्खनन बंद करण्याचा आदेश याआधी खाण खात्याने जारी केला होता.

सर्वोच्च न्यायालयाने 7 फेब्रुवारी रोजी दिलेल्या खाणबंदी आदेशाच्या पार्श्‍वभूमीवर खाण खात्याने आदेशाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात केली होती. खाण संचालक प्रसन्‍न आचार्य यांनी खात्याचे सर्व उपसंचालक, तांत्रिक विभागाचे कर्मचारी यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या तत्काळ व कडक अंमलबजावणीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश 6 मार्च रोजी दिलेले होते. राज्यातील लोह खनिज उत्खनन मंगळवार दि. 13 मार्चपासून बंद करावे, 14 मार्च पासून खनिज वाहतूक बंद करावी आणि खाणींवरील सर्व यंत्रणा 15 मार्च रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत हलवावी, असा आदेश गेल्या मंगळवारी (दि. 6) जारी करण्यात आला होता. खाण खात्याने आधी दिलेल्या 

निर्देशात बदल करण्यात आला असून, खनिज व्यावसायिकांनी येत्या दि. 15 पर्यंत खनिज उत्खनन व वाहतूक सुरू ठेवता येईल, असे जाहीर केले. एरवीही दररोज सायंकाळी 7 वाजता खनिज वाहतूक बंद होत असल्यामुळे, येत्या गुरुवारी (दि. 15) सायंकाळी 7 वाजल्यापासून खनिज वाहतूक राज्यभर पूर्णपणे बंद होणार आहे. त्यानंतर नव्याने पर्यावरणीय दाखले आणि लिजेस मिळाल्यानंतर खाणी पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत,  असे नव्या निर्देशात नमूद केले आहे. 

राज्यातील सर्व लिजधारक, खाण मालक, एजंट्स व खाणींच्या व्यवस्थापकांना खनिज खाण बंद करण्यापूर्वी खाणीच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करावी, असे केंद्र सरकारच्या खाण सुरक्षा संचालनालयाने कळवले आहे. गोव्यातील लिजांचा लिलाव करावा की अन्य कोणती पावले उचलावीत हे राज्य सरकारने अजून ठरवलेले नाही. न्यायालयाच्या आदेशानुसार व केंद्रीय ‘माईन्स व मिनरल्स डेव्हलपमेंट अ‍ॅण्ड रेग्यूलेशन’ (एमएमडीआर) नुसार लिजांचा लिलाव करावा लागेल याची कल्पना सरकारातील अनेक मंत्र्यांना  असली तरी याबाबतीत जनक्षोभाच्या भीतीने उघड कोणीही बोलण्यास तयार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.