Tue, Jul 23, 2019 10:28होमपेज › Goa › खाणी बंद 

खाणी बंद 

Published On: Mar 16 2018 1:23AM | Last Updated: Mar 16 2018 12:40AMपणजी : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाने 7 फेब्रुवारी 2018 रोजी दिलेल्या आदेशानुसार, राज्यातील खनिज उत्खनन आणि वाहतूक  गुरूवार दि.15 मार्चच्या संध्याकाळपासून बंद झाले आहे. खाणबंदीमुळे खाण व्यवसायावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अवलंबून असणारे सुमारे 2 लाख लोक बरोजगारीच्या संकटात सापडले आहेत.

ट्रक मालक, चालक, बार्ज व्यावसायिक, वाहन दुरुस्ती व्यावसायिक, सुटे भाग विक्रेते, खाणपट्ट्यातील  हॉटेल व अन्य सुविधा पुरवणारे व्यावसायिक अशा खाण अवलंबितांचा त्यात समावेश असून खाणी पुन्हा कधी सुरू होतील, याची प्रतीक्षा सुरू झाली आहे.

खाण बंदीमुळे खाणींवरील सर्व मालमत्ता आणि लोह खनिज माल सरकारच्या ताब्यात गेला आहे. पोर्तुगीज राजवटीपासून सुरू असलेला खाण व्यवसाय दुसर्‍यांदा ठप्प झाला आहे. खाण बंदीच्या निमित्ताने राज्यातील जनतेला 2012 साली लागू झालेली खाणबंदी व त्याचे परिणाम आठवून पोटात गोळा आला आहे. 

खाण परिसरात शुकशुकाट पसरला असून खाण व्यवसाय पूर्णपणे ठप्प होणार असल्याने अवलंबितांच्या काळजाचे ठोके वाढले आहेत. खाणबंदीमुळे काही खाण कंपन्यांनी कामगार कपातीचा निर्णय घेतला आहे. यामुळे कामगारवर्गातही खळबळ  उडाली आहे. 

याआधी सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या न्या. एम. बी. शहा आयोगाने राज्यात 2005 ते 2012 या कालावधीत खाण व्यवसायात 35 हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याने सक्त कारवाई करण्याचे सूचित केले होते. या घोटाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर, सर्वोच्च न्यायालयाने ऑक्टोबर-2012 ते एप्रिल- 2014 असे 19 महिने खाण व्यवसायावर बंदीची काळी चादर घातली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने  अनेक अटी व नियम  घालून 20 दशलक्ष टनाची मर्यादा घालून खनिज उत्खननास परवानगी दिली होती.

मात्र, खाणबंदी उठवल्यानंतरही प्रत्यक्षात 18 महिन्यांनी , म्हणजे ऑक्टोबर- 2015 मध्ये खनिज उत्खनन सुरू करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक व्यवस्थेचा कणा मानला जात असलेला खाण व्यवसाय पुन्हा गतवैभवाला पोहचला नाही,तोवरच पुन्हा खाणबंदी लागू झाली आहे.  दरम्यान,राज्यात 2015-16 साली फक्त 7.2 दशलक्ष टनाचे उत्खनन झाले होते. यामुळे 2015पासून आतापर्यंतच्या  सुमारे 37.11 दशलक्ष टन खनिजाचे उत्खनन झाले असून त्याचे बाजारी मूल्य  1243.54 कोटी रूपये झाले असल्याची माहिती खाण खात्याच्या सूत्रांनी दिली.