होमपेज › Goa › खनिज वाहतूक बेकायदेशीर 

खनिज वाहतूक बेकायदेशीर 

Published On: Apr 25 2018 2:37AM | Last Updated: Apr 25 2018 2:34AMपणजी : प्रतिनिधी  

खाण कंपन्यांनी केलेले  खनिज मालाचे उत्खनन हे बेकायदेशीर असल्याने त्याची वाहतूकदेखील बेकायदेशीरच ठरते, असा युक्‍तिवाद   गोवा फाऊंडेशनच्यावतीने नॉर्मा आल्वारीस यांनी मंगळवारी (दि.24) मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात  केला.

युक्‍तिवाद बुधवारी (दि.25) पुन्हा सुरू राहणार आहे. खनिज मालाची  रस्ता मार्गे  वाहतूक करण्यास परवानगी  द्यावी या मागणीसाठी खाण कंपन्यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. गोव्यातील खनिज लिजांची मुदत 2007 साली संपुष्टात आली.  त्यामुळे त्यांचे नूतनीकरण आवश्यक होते; परंतु नूतनीकरणाशिवाय  2012  सालापर्यंत या लिजांतून बेकायदेशीरपणे खनिज मालाचे खाण कंपन्यांनी उत्खनन केले. 2014 साली जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने खाण बंदी उठवली तेव्हा या खनिज लिजांचे नूतनीकरण करू नये, असे  नमूद केले होते.

परंतु असे असूनही सरकारने या खनिज लिजांचे नूतनीकरण केले. खाण कंपन्यांनी या लिजांमधून   खनिज मालाचे उत्खनन करून त्याची वाहतूक केली. त्यामुळे हा खनिज माल बेकायदेशीरच ठरतो, असा युक्‍तिवाद आल्वारीस यांनी यावेळी केला.