Thu, Jul 18, 2019 10:38होमपेज › Goa › पणजीत कडेकोट बंदोबस्त

पणजीत कडेकोट बंदोबस्त

Published On: Mar 21 2018 1:41AM | Last Updated: Mar 21 2018 1:41AMपणजी : प्रतिनिधी

खाण अवलंबित आंदोलक पुन्हा पणजीत धडकू नयेत, यासाठी खबरदारी म्हणून शहरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दोन्ही मांडवी पूल, आझाद मैदान परिसर, मांडवी नदीकाठ, कदंब बसस्थानकासह महत्त्वाच्या ठिकाणांवर सुरक्षेत वाढ करण्यात आली  आहे. याबाबतचे आदेश गोवा पोलिस महासंचालक डॉ. मुक्‍तेश चंदर यांनी जारी केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.  

बंदोबस्तासाठी तैनात पोलिसांमध्ये गोवा पोलिसांसह महाराष्ट्र पोलिस तसेच निमसुरक्षा दलाच्या जवानांचा समावेश आहे. कायदा व  सुव्यवस्था अबाधित  राहून वाहतूक सुरळीत रहावी, या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे. 

खाण बंदीवर तोडगा काढावा, या मागणीसाठी सोमवारी शेकडोंच्या संख्येने खाण अवलंबित पणजीत धडकले होते. सदर मागणीकडे  सरकारचे लक्ष वेधण्यासाठी या आंदोलकांनी शहरातील वाहतूक सुमारे चार तास रोखून सर्वांना  वेठीस धरले. तसेच दगडफेक करून वाहनांचीही तोडफोड केली,  परिणामी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे  कायदा व  सुव्यवस्थेचा प्रश्‍नही निर्माण झाला होता. तशी स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, तसेच  खाण आंदोलकांना पणजीत प्रवेश करण्यापासून प्रतिबंधासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्यामुळे गोवा पोलिस महासंचालकांच्या कार्यालयातून जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार मांडवी पुलांसह पणजीला येणार्‍या मार्गावरील खांडोळा पूल, बाणस्तारी पूल, कुठ्ठाळी पूल, करासवाडा जंक्शन आदी महत्वाच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

बेकायदेशीरपणे आंदोलन करणार्‍या आंदोलकांवर कठोर कारवाई करावी. यासाठी  वापरण्यात येणार्‍या राज्याबाहेरील सुरक्षा यंत्रणेला  आवश्यक ते निर्देश द्यावेत. तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी खबरदारी घ्यावी, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे, असे सूत्रांनी सांगितले.