Tue, May 26, 2020 21:55होमपेज › Goa › विलीनीकरण निर्णयासाठी अवधीची मागणी

विलीनीकरण निर्णयासाठी अवधीची मागणी

Published On: Sep 11 2019 2:29AM | Last Updated: Sep 11 2019 1:13AM
पणजी : प्रतिनिधी
म्हापसा अर्बन बँकेचे पंजाब व महाराष्ट्र सहकारी बँकेत (पीएमसी)विलीनीकरण करण्यासाठी चर्चेची एक फेरी झाली असून लवकरच दुसरी फेरी होणार आहे. त्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेकडे दोन आठवड्यांचा अवधी सरकारकडून मागण्यात आला आहे, अशी माहिती सहकार मंत्री गोविंद गावडे यांनी दिली. 

आल्तिनो-पणजी येथील शासकीय बंगल्यात सोमवारी सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हापसा अर्बन व पीएमसी बँकेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेतली. या बैठकीसंबंधी माहिती देताना मंत्री गावडे यांनी सांगितले की, म्हापसा अर्बन बँकेच्या विलीनीकरणाबाबत 

चर्चेसाठी सर्व घटकांसमवेत संयुक्‍त बैठक घेण्यात आली. बँक अवसायनात काढल्यास भागधारकांचे तसेच कर्मचार्‍यांचे अतोनात नुकसान होणार असून त्यापेक्षा विलीनीकरण करणे अधिक चांगले आहे. यासंबंधी म्हापसा बँकेच्या संचालक मंडळाला विलीनीकरणाबाबत ठराव घेण्यास सांगण्यात आले आहे. 

म्हापसा अर्बन बँक ताब्यात घेण्यासाठी ‘पीएमसी’बँकेने प्रक्रिया सुरू केली असून बँकेच्या सर्व मालमत्तांचा मूल्यमापन अहवालही तयार केला आहे. आणखी काही अतिरिक्‍त माहितीची त्यांनी मागणी केली असल्याने थोडी अडचण आलेली आहे. म्हापसा बँक ही बहुराज्य बँक असल्याने ती केंद्रीय सहकार निबंधकांच्या अधिकारकक्षेत येते. त्यामुळे बँकेवर प्रशासक नेमण्याचा राज्य सहकार निबंधकाला अधिकार नाही, असेही सांगण्यात आले.

बँकेच्या विलिनीकरणाबाबत प्रक्रियेला वेग आला असून यासाठी आणखी दोन आठवड्यांची मुदत देण्याची भारतीय रिझर्व्ह बँकेकडे मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात अर्थ नसल्याने निवडणूक एकतर रद्द करावी, अथवा पुढे ढकलण्याचा ठराव संचालक मंडळाने घ्यावा, असे सोमवारच्या बैठकीत सांगण्यात आले असल्याचे गावडे यांनी सांगितले. 

म्हापसा अर्बन सहकारी बँकेचा प्रश्‍न निवडणूक लांबणीवर
म्हापसा : प्रतिनिधी
म्हापसा अर्बन को-ऑप बँकेची दि.14 सप्टेंबर रोजी ठरलेली निवडणूक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी बँकेच्या प्रश्‍नात लक्ष घातल्याने पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती बँकेचे चेअरमन डॉ. गुरुदास नाटेकर यांनी पत्रकारांना दिली. येत्या आठवड्यात बँकेची आमसभा बोलावण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. संचालक तथा माजी चेअरमन अ‍ॅड. रमाकांत खलप यावेळी उपस्थित होते.

म्हापसा अर्बनच्या संचालक मंडळाची मंगळवारी संध्याकाळी तातडीची बैठक बोलावून मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या तोडग्याची माहिती देण्यात आली. सर्वांनी त्यास दुजोरा दिला. शेवटी ही माहिती आमसभेपुढे ठेवण्यासाठी येत्या आठवड्यात भागधारकांची विशेष बैठक बोलावण्यात येणार आहे. मात्र तारीख अजून निश्‍चित केली नसल्याचे नाटेकर यांनी सांगितले. बँकेचे भागधारक, ग्राहक व ठेवीदार तसेच बँकेच्या हितार्थ विलिनीकरणाचा प्रस्ताव मान्य करावा लागला, असे डॉ. नाटेकर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सावंत यांनी आपल्या निवासस्थानी सहकार मंत्री गोविंद गावडे, म्हापसा अर्बनचे चेअरमन व संचालक, जनरल मॅनेजर व पंजाब महाराष्ट्र सहकारी बँकेचे संचालक, जनरल मॅनेजर तसेच मुख्य सचिव, अर्थ सचिव, सहकार निबंधक व इतर अधिकार्‍यांसमवेत बैठक घेऊन सर्वांची मते जाणून घेतली. म्हापसा अर्बन बँकेचे पंजाब महाराष्ट्र (पीएमसी) बँकेत विलिनीकरण करण्याचा अभिप्राय बैठकीत सर्वानुमते व्यक्‍त करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करण्याच्या दिलेल्या आश्‍वासनामुळे दि.14 सप्टेंबर रोजी होणारी निवडणूक पुढे ढकलण्यात आली, असे नाटेकर यांनी सांगितले.