Wed, Jul 24, 2019 06:31होमपेज › Goa › म्हादईमुक्त करण्याच्या दिशेने भाजपची पावले

म्हादईमुक्त करण्याच्या दिशेने भाजपची पावले

Published On: Jan 05 2018 1:06AM | Last Updated: Jan 04 2018 11:01PM

बुकमार्क करा
पणजी: प्रतिनिधी

म्हादईचे पाणी कर्नाटकाला देणे अपरिहार्य असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे हे वक्‍तव्य  म्हणजे एकप्रकारे गोवा म्हादईमुक्‍त  करण्याच्या दिशेने  भाजपची  पावले  पडत असल्याचे निदर्शक आहे,अशी टीका शिवसेना गोवाच्या उपाध्यक्ष  राखी प्रभूदेसाई नाईक यांनी पणजीत पत्रकार परिषदेत केली.  म्हादई बचावासाठी शिवसेनेतर्फे लवकरच आंदोलन छेडले जाईल,असेही त्यांनी सांगितले.

नाईक म्हणाल्या, म्हादई प्रश्‍नी गोव्याच्या हिताशी तडजोड केली जाणार नाही. गोव्याचे हित जपले जाईल, असे मुख्यमंत्री पर्रीकर यांनी मागील मंत्रिमंडळ बैठकीवेळी म्हटले होते. मात्र आता तेच म्हादईचे पाणी कर्नाटकाला  देणे  अपरिहार्य असल्याचे म्हणत आहेत. यावरून त्यांची ही दोन्ही विधाने एकमेकांशी फारकत  घेणारी आहेत,हे दिसून येते.  म्हादई बचावासाठी  राष्ट्रीय जलतंटा लवादासमोर लढा सुरु असतानाच त्यांचे अशा प्रकारचे विधान योग्य नाही.   गोव्याची 80 टक्के जनता ही   म्हादईच्या पाण्यावर अवलंबून आहे. अशा वेळी कर्नाटकाला पाणी देण्याचा प्रश्‍नच उद्भवत नाही.

शिवसेना गोवाचे उपाध्यक्ष  तथा प्रवक्‍ते जितेश कामत म्हणाले, कर्नाटकाला म्हादईचे पाणी देणे जर अपरिहार्य आहे, तर मग म्हादईच्या पाणी वाटपप्रश्‍नी लवादासमोर गोवा सरकार खटला का लढवत आहे? म्हादई लवादाने 2016  साली कर्नाटकाला  म्हादईचे पिण्याचे पाणी देऊ नये,असा निकाल  दिला होता. त्यामुळे म्हादई लढ्याचा पहिला टप्पा गोव्याने जिंकला होता. मात्र आता मुख्यमंत्री पर्रीकर यांनी म्हादईप्रश्‍नी घेतलेल्या भूमिकेमुळे जर म्हादईचा लढा  गोवा हरला तर त्याला पूर्णपणे तेच जबाबदार असतील, असे कामत  म्हणाले. यावेळी  सुरज वेर्णेकर व अन्य शिवसैनिक उपस्थित होते.