Fri, Mar 22, 2019 06:16
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › म्हादईप्रश्‍नी अवमान याचिका मसुद्याचे काम सुरू 

म्हादईप्रश्‍नी अवमान याचिका मसुद्याचे काम सुरू 

Published On: Jul 26 2018 1:32AM | Last Updated: Jul 26 2018 1:32AMपणजी : प्रतिनिधी

म्हादईचे पाणी  मलप्रभा नदीत वळवण्याचा कर्नाटककडून सुरू असलेल्या  प्रयत्नांचे गांभीर्य सरकारला आहे. याप्रश्‍नी लवकरच कर्नाटक विरुद्ध दिल्‍ली येथील जलतंटा लवादांसमोर अवमान याचिका दाखल केली जाणार आहे. या अवमान याचिकेचा मसुदा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विधानसभेत बुधवारी म्हादईबाबतच्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले.कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स व डिचोलीचे आमदार राजेश पाटणेकर यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती.

मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले,  म्हादई विषयाचे गांभीर्य सरकारला आहे.  याप्रश्‍नी  राज्याचे हित जपायचे आहे. कर्नाटककडून म्हादईचे पाणी वळवण्यासाठी  सुरू असलेले बांधकाम बेकायदेशीर असून त्यासंबंधी गोवा सरकार अवमान याचिका दाखल करणार आहे. अवमान याचिकेचा मसुदा तयार करण्यात येत असून शक्यतो गुरुवारी  अवमान याचिका दाखल केली जाईल. कर्नाटकमध्ये कुठल्या पक्षाचे सरकार आहे, हे महत्त्वाचे नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

आमदार आलेक्स रेजिनाल्ड  लॉरेन्स म्हणाले, कर्नाटकाकडून बेकायदेशीरपणे खुलेपणाने  म्हादईचे पाणी वळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कर्नाटकाकडून मलप्रभा नदीत पाणी वळणवण्यात आल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात गोव्यातील जलसंपदेवर परिणाम होणार. त्यामुळे सरकारने वेळीच पावले उचलावीत. कर्नाटकचा बेकायदेशीरपणा  पर्यावरण प्रेमींनी उघड केल्यानंतर जलस्रोत खाते जागे होते, अशी टीकाही त्यांनी केली.

आमदार राजेश पाटणेकर  म्हणाले,  म्हादई प्रश्‍न जलतंटा लवाद तसेच सर्वोच्च न्यायालयात असल्याने हा विषय न्यायप्रविष्ट आहे. मात्र, तरी देखील कर्नाटकाचा बेकायदेशीरपणा सुरूच आहे. कर्नाटक  इतके धाडस कसे करु शकतो. जर म्हादईचे पाणी वळवण्यात कर्नाटकाला यश आले तर गोव्यातील 100 हून अधिक गावांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे   सरकारने त्वरीत पावले उचलावीत.

जलस्त्रोत मंत्री विनोद पालयेकर म्हणाले, म्हादई ही गोव्याची जीवनदायिनी आहे. या नदीचा 78 टक्के भाग गोव्यात आहे. मात्र  मागील  38 वर्षांपासून कर्नाटक हे पाणी वळणण्याचा प्रयत्न करीत आहे. गोव्याने याचा नेहमीच विरोध  केला आहे.या घटनेचे गांभीर्य सरकारला माहिती आहे. जलस्त्रोत खात्याचे पथक दिल्‍लीत गेले आहे. कर्नाटकाकडून केल्या जाणार्‍या पाणी वळवण्याच्या या  बेकायदेशीर गोष्टीविरोधात  त्वरीत  अवमान याचिका  दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कणकुंबीत लक्ष ठेवण्यास पथक नेमा : काब्राल

जलतंटा लवादाची परवानगी घेऊन  म्हादईचे जिथून  पाणी वळवण्याचा  कर्नाटकाकडून  प्रयत्न सुरू आहे, त्याठिकाणी म्हणजेच कणकुंबी येथील घटनाक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी  पथकाची नियुक्‍ती करावी, अशी मागणी   कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी  विधानसभेत केली.