Tue, Jun 25, 2019 21:56होमपेज › Goa › म्हादईसंदर्भात कसलाही ना हरकत दाखला दिला नाही 

म्हादईसंदर्भात कसलाही ना हरकत दाखला दिला नाही 

Published On: Dec 29 2017 1:35AM | Last Updated: Dec 29 2017 12:43AM

बुकमार्क करा
पणजी : प्रतिनिधी

म्हादईचे पाणी कर्नाटक वा महाराष्ट्राकडे वळविण्यासाठी लागणारा ना हरकत दाखला 2007 मध्ये तत्कालीन  मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी दिला आहे, या भारताचे अतिरिक्‍त सॉलिसीटर जनरल अ‍ॅड. आत्माराम नाडकर्णींंं यांच्या  विधानाचे प्रतापसिंह राणे यांनी खंडन केले. आपण मुख्यमंत्री असताना म्हादई संदर्भात कोणत्याही प्रकारचा ना हरकत दाखला दिलेला नाही, असे सांगून तत्संबंधी  नाडकर्णींचे हे विधान  तिरस्करणीय असल्याचे माजी मुख्यमंत्री राणे यांनी सांगितले. काँग्रेसच्या 133 व्या स्थापना दिनानिमित्त पणजीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात राणे बोलत होते. यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव गिरीश चोडणकर उपस्थित होते.     

‘नाडकर्णींकडून लोकांची दिशाभूल’

पणजी : प्रतिनिधी

अ‍ॅड. नाडकर्णी अशी विधाने करून लोकांची दिशाभूल  करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी केलेला आरोप चुकीचा असून आपण म्हादईचे पाणी अन्यत्र वळविण्याला कोणतीही मंजुरी दिली नव्हती, असेही ते म्हणाले.

ते म्हणाले, आपण मुख्यमंत्री असताना म्हादईचे पाणी वळविण्याचा निर्णय आपण घेतला नव्हता. मुळात एका नदीतून  दुसर्‍या नदीच्या पात्रात पाणी वळवले जाऊ शकत नाही येथून या विषयाची सुरूवात होते.  लवादाच्या निर्णयानंतरही कर्नाटकाने कळसा भांडुरा प्रकल्पाचे काम सुरू ठेवले, हे चुकीचे आहे. पर्यावरणीय नियम पायदळी तुडवून हे काम सुरू ठेवण्यात आले असून आता या विषयावर बोलण्यात काही अर्थ नाही. सध्या गाजणार्‍या विषयात काँग्रेसचे नाव घेऊन लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे.

गिरीष चोडणकर म्हणाले,  भाजपने उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्याचा काँग्रेसने खुलासा द्यावाच, असे काही नाही. भाजपचे प्रत्येक पाऊल निवडणूक जिंकण्यासाठीच असते.  कर्नाटकात होणार्‍या आगामी विधानसभा निवडणुकांमुळेच म्हादईचा विषय गाजतो आहे. त्यामुळे भाजपने टाकलेल्या जाळ्यात  अडकून काहीही विधान न करता, प्रदेश काँग्रेस या विषयावर आपल्या तर्‍हेने विचार करेल, असेही त्यांनी सांगितले.