Tue, Jul 23, 2019 11:04होमपेज › Goa › म्हादईप्रश्‍नी कर्नाटकाविरुद्ध अवमान याचिका दाखल

म्हादईप्रश्‍नी कर्नाटकाविरुद्ध अवमान याचिका दाखल

Published On: Aug 09 2018 1:35AM | Last Updated: Aug 10 2018 12:56AMपणजी : प्रतिनिधी

कर्नाटक राज्याने कळसा-भंडुरा येथे म्हादई नदीचे पाणी वळविल्याप्रकरणी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात बुधवारी अवमान याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने तसेच जलतंटा आयोगाने आपल्या अंतरिम आदेशात सदर वादग्रस्त भागात ‘जैसे थे’ परिस्थिती ठेवण्यास बजावले असूनही कर्नाटकाने म्हादईचे पाणी वळविल्याने अवमान याचिका दाखल केल्याचे जलस्रोत मंत्री विनोद पालयेकर यांंनी सांगितले. कळसा नदीचा प्रवाह कर्नाटक निरावरी निगमने कणकुंबीत कालव्याला भगदाड पाडून भूमिगत मार्गाने मलप्रभा नदीत वळवल्याच्या प्रकार नुकताच 23 जुलै 2018 रोजी उघडकीस आला होता. 

म्हादई नदीचे पाणी मलप्रभा नदीपात्रात वळवल्याप्रकरणी  देशाचे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांच्या सल्ल्यानुसार न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यासह सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब  करण्याचे स्वातंत्र्य सरकारला असल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी  2 ऑगस्ट रोजी विधानसभेत सांगितले होते. कर्नाटकाने म्हादई नदीचे पाणी अडवून ते मलप्रभा नदीत वळवल्याप्रकरणी  सर्वोच्च न्यायालयानेे दखल घ्यावी, अशी विनंती राज्य सरकारने केली आहे. हे पाणी पुन्हा सुर्ला नदीत सोडावे अशी मागणीही या अवमान याचिकेत केली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, जलस्त्रोत मंत्री विनोद पालयेकर आणि जलस्त्रोत खात्याने कर्नाटक राज्याला पत्र लिहून कळविले असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

कर्नाटक अणि गोवा राज्यातून म्हादई नदी वाहत असून या पाण्याचा वापर कर्नाटक राज्यातील शेतकर्‍यांना   करता यावा, यासाठी म्हादईचा प्रवाह वळवण्याचे छुपे प्रयत्न  कर्नाटकाकडून काही वषेृ सुरू आहे. या प्रकरणी दिल्ली येथील जलतंटा आयोगासमोर सुनावणी सुरू असून हा खटला अंतिम टप्प्यात पोचला आहे. आयोगाने या प्रकरणी निकाल द्यायचा आहे. त्याआधीच भूमिगत मार्गाने म्हादईचा प्रवाह वळवण्यात आला असल्याचे निदर्शनात आल्याने राज्य सरकारकडून दखल घेऊन अवमान याचिका दाखल केल्याचे ठरवले होते.

आयोग निकाल देण्याची शक्यता

जलतंटा आयोगाची मुदत 20 ऑगस्ट रोजी संपुष्टात येत आहे. आयोगापुढे दोन्ही पक्षकारांनी आपल्या बाजू मांडल्या आहेत. त्याआधी या प्रश्‍नावर आयोग आपला निकाल देण्याची शक्यता आहे. त्यामुळेच कर्नाटक राज्याने घाई करून म्हादई नदीचे पाणी वळवण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे.