Fri, Feb 22, 2019 20:27होमपेज › Goa › अवमान याचिकेसह सर्व मार्ग खुले 

अवमान याचिकेसह सर्व मार्ग खुले 

Published On: Aug 03 2018 1:34AM | Last Updated: Aug 03 2018 12:48AMपणजी : प्रतिनिधी

कर्नाटक राज्याने म्हादई नदीचे पाणी मलप्रभा नदीपात्रात वळवल्या-प्रकरणी देशाचे अतिरिक्‍त सॉलिसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांच्या सल्ल्यानुसार न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यासह सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब  करण्याचे स्वातंत्र्य सरकारला आहे, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.  

विधानसभेत मत्स्योद्योग, जलस्रोत आणि वजनमाप खात्यावरील अनुदान मागण्यांवरील चर्चेवेळी  ते बोलत होते. मत्स्योद्योग मंत्री विनोद पालयेकर यांनी अन्य सर्व विषयांवर उत्तर दिले तरी म्हादई प्रश्‍नी माहिती न दिल्यामुळे विरोधी आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी तीव्र आक्षेप घेतला. या चर्चेत हस्तक्षेप करताना मुख्यमंत्री म्हणाले, की म्हादई प्रश्‍नाबाबत दोन दिवसांत जलतंटा आयोगाकडे अवमान याचिका दाखल करणार असल्याचे मंत्री पालयेकर यांनी सांगितले होते. मात्र, कायद्याच्या सर्व बाजू तपासून आणि सर्व घटकांना विश्‍वासात घेऊनच पुढे पाऊल टाकणे आवश्यक  आहे. यासाठी म्हादईप्रश्‍नी कुठल्या न्यायालयात व कोणत्या बाबीवर दाद मागायची याबाबत कायदेशीर सल्ला घेण्यात आला आहे. देशाचे अतिरिक्‍त सॉलिसीटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांचा सल्ला घेण्यात आला आहे. सरकार या विषयाबाबत पूर्ण गंभीर असून त्यात कोणतीही हयगय केली जाणार नाही. मात्र, सरकारचे सर्व डावपेच विधानसभेत उघड करणे शक्य नाही, आणि ते संयुक्‍तिक ठरणारही नाही. याविषयी लवकरच पुढील निर्णय जाहीर केला जाणार आहे.