Thu, May 23, 2019 20:24
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › ...अन्यथा लोकसभेसाठी उमेदवार उभा करणार

...अन्यथा लोकसभेसाठी उमेदवार उभा करणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मडगाव ः प्रतिनिधी

जिल्हा पंचायतीला निधी आणि अधिकार मिळत नसल्याच्या विषयावरून दक्षिण गोवा जिल्हा पंचायत मंडळाची बैठक गदारोळात झाली. सरकारने प्रत्येकवेळा आश्‍वासन देऊनही दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीला अधिकार आणि निधी पुरवलेला नाही. तुटपुंज्या निधीत विकासकामे करणे शक्य नाही. सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आगामी लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातून जिल्हा पंचायत सदस्यांपैकी उमेदवार उभा केला जाईल, असा ठराव बैठकीत घेण्यात आला.

  जिल्हा पंचायत सदस्य गोविंद सावंत यांनी सांगितले, की जिल्हा पंचायतकडे विकासकामासाठी मिळणारा निधी अत्यंत कमी आहे. त्यातून विकासकामे करणे शक्य नाहीत. नुसत्या बैठका बोलावून चर्चा करण्याचा काय उपयोग आहे. जिल्हा पंचायत मंडळाच्या बैठकीत घेतलेले ठराव तसेच पडून आहेत. विकास निधी आलेला नसल्यामुळे कामे होऊ शकलेली नाहीत. विनाकारण बैठका घेऊ नयेत.
जिल्हा पंचायत सदस्या नेली रॉड्रिगीस यांनी सांगितले, की विकासकामे होत नाहीत. आम्ही समिती तयार केली आहे. पण, समितीकडून कामासंदर्भात काही माहिती दिली जात नाहीत. नुकतेच शासनाने आमदारांना पंचवीस कोटी रुपये विकासकामांसाठी जाहीर केले आहेत. आमच्या प्रत्येक सदस्या अंतर्गत चार ते पाच पंचायती येतात. मात्र, सरकार जिल्हा पंचायत सदस्यांना निधी वाढवून देत नाहीत.मुख्याधिकारी पंढरीनाथ नाईक यांनी सांगितले, की आपण मुख्याधिकारी पदाचा  ताबा घेऊन केवळ दोन महिने झाले आहेत.आपण लवकरच सर्व गोष्टींत सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचे  आश्वासनही त्यांनी दिले.निधी आणायचे काम अध्यक्षांचे आहे. निधी शिवाय कामे होऊ शकत नाहीत, असे ते म्हणाले.जयदीप शिरोडकर यांनी जिल्हा पंचायतीला मुख्यमंत्री पर्रीकर यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले होते, असे सांगितले. सुवर्णा तेंडुलकर यांनी सांगितले, की  आम्ही सर्वजण एकत्र असून पक्ष स्थरावर भेदभाव करू नये. विकास 

कामासाठी निविदा देऊन अनेक महिने झाले आहेत. पण कामाचे आदेश मिळालेले नाही. मुरेनो रिबेलो यांनी सांगितले, की जिल्हा पंचायतीच्या सदस्यांना अधिकार आणि मानधन वाढवून दिले जावेत. लोक देणग्यांसाठी सदस्यांकडे येतात त्यांना कुठून  देणग्या देणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बैठकीची पद्धत बदलावी असे त्यांनी सांगितले.   मारिया रिबेलो यांनी सांगितले, की उत्तर गोव्यातील सदस्यांना बैठकीत उपस्थित राहण्यासाठी भत्ता  दिला जातो. पण, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींच्या सदस्यांना मानधन दिले जात नाही. नेली रॉड्रीगीस यांनी सदस्यांना मानधन आणि 2015 पासूनचा थकीत फरक मिळावा असा ठराव मांडला.आणि सर्वमताने तो मंजूर झाला.

गोविंद सावंत यांनी सदस्यांना अधिकार मिळावे म्हणून माजी जिल्हा पंचायत सदस्य  संतान रॉड्रीगस यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे, अशी माहिती दिली. त्यास समर्थन देण्याचा ठराव मांडला. नेली रॉड्रीगीस यांनी त्यांना समर्थन दिले. खुशाली गावकर यांनी नद्यांचे राष्ट्रीयीकरण आणि कोळसा विस्तारीकरणाला विरोध केला.त्यांच्या ठरावाला मारिया रिबेलो सह इतर सदस्यांनी पाठिंबा दिला. जिल्हा पंचायत अध्यक्ष नवनाथ नाईक वीस दिवस रजेवर गेल्याने उपाध्यक्षा चित्रा फडते यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.