Wed, Apr 24, 2019 07:47होमपेज › Goa › खाणबंदीबाबत चार दिवसांत बैठक

खाणबंदीबाबत चार दिवसांत बैठक

Published On: Jun 16 2018 1:29AM | Last Updated: Jun 16 2018 12:01AMपणजी : प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या खाणबंदीच्या आदेशानंतर खनिज व्यवसायावर अवलंबून असलेल्या लोकांवर आणि उद्योग-व्यवसायावर झालेल्या परिणामाबाबत चर्चेसाठी येत्या सोमवार किंवा मंगळवारी बैठक घेण्यास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सहमती दर्शवली असल्याची माहिती ‘मगो’चे आमदार दीपक पाऊसकर यांनी दिली.

मुख्यमंत्री पर्रीकर यांची  पाऊसकर यांनी शुक्रवारी भेट घेतली. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, आपण मुख्यमंत्री पर्रीकर यांची भेट घेऊन राज्यातील बंद असलेल्या खाण व्यवसायासंदर्भात चर्चा केली.  खाणींवरील काढून टाकण्यात आलेल्या कामगारांना संरक्षण देणे आणि खाणग्रस्त ट्रक व्यावसायिकांना आर्थिक मदत देण्यासंबंधीही  सविस्तर चर्चा झाली. यावेळी खाणबंदीवर तोडगा काढण्यासाठी सर्व घटकांशी  चर्चा करणे आवश्यक असून सोमवारी अथवा मंगळवारी बैठक घेण्याचे आश्‍वासन पर्रीकरांनी  दिले आहे.  खाणीसंबंधित सर्व घटक, खाणग्रस्त भागातील आमदार, अ‍ॅडव्होकेट जनरल अ‍ॅड. दत्तप्रसाद लवंदे तसेच भूगर्भ व खाण खात्याचे संचालक प्रसन्न आचार्य यांना या बैठकीसाठी बोलावले जाणार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितल्याची माहिती आमदार दीपक पाऊसकर यांनी दिली.