पणजी : प्रतिनिधी
भाजपच्या सगळ्या मंत्र्यांनी जनतेची गार्हाणी ऐकून घेण्यासाठी पणजी येथील पक्षाच्या मुख्यालयात बसावे, असे निर्देश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. या सूचनेप्रमाणे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.
लोकांशी असलेला संपर्क तुटू नये यासाठी खास करून भाजप कार्यकर्त्यांशी नियमित सल्लामसलती करून समस्या दूर करण्याचा प्रयत्न भाजप नेते नेहमीच करत आहेत. मात्र, मागील अनेक महिन्यांत भाजप मंत्री कार्यकर्त्यांना भेटत नसल्याने व त्यांचे काम होत नसल्याच्या अनेक तक्रारी पक्षाच्या वरिष्ठांकडे आल्या आहेत. यामुळे सर्व तालुक्यांतील लोकांना राजधानीत एका दिवसासाठी भाजप कार्यालयात मोकळेपणाने भेटण्याचा आदेश भाजप वरिष्ठांनी सर्व मंत्र्यांना दिला असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर आणि केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक हेसुद्धा पक्ष कार्यालयात बसून कार्यकर्ते आणि लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत. पुढच्या आठवड्यात वीजमंत्री पांडुरंग मडकईकर आणि पंचायतमंत्री माविन गुदिन्हो पक्ष कार्यालयात बसणार आहेत.