Mon, Jun 24, 2019 16:37होमपेज › Goa › रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास उपोषणाचा महापौरांचा इशारा

रस्त्यावरील खड्डे न बुजवल्यास उपोषणाचा महापौरांचा इशारा

Published On: Sep 02 2018 1:11AM | Last Updated: Sep 02 2018 1:11AMपणजी : प्रतिनिधी

पणजी महानगरपालिकेचे आयुक्‍त रॉय यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्डे येत्या 48 तासांत न बुजवल्यास सहकारी नगरसेवकांसोबत मनपा कार्यालयासमोर  उपोषणाला बसू, असा इशारा महापौर विठ्ठल चोपडेकर यांनी शनिवारी (दि.1) पत्रकार परिषदेत दिला. मनपा आयुक्‍त रॉय कामे अडवून ठेवतात. कुठलाही निर्णय घेताना विश्‍वासात घेत नसल्याने त्यांना त्वरित हटवण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली.

महापौर चोपडेकर म्हणाले की, शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासंदर्भात वेळोवेळी आयुक्‍त रॉय यांच्याशी चर्चा करण्यात आली होती. परंतु त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. कित्येक महिन्यांनंतर आता या संदर्भात निविदा मागवल्या आहेत.  शहरातील खड्डे बुजवण्यास मनपा, महापौर अपयशी ठरल्याच्या टीका  नागरिक करतात. यास आयुक्‍त जबाबदार आहेत. त्यांना वारंवार सांगूनदेखील त्यांनी काहीच केले नसल्याचे चोपडेकर यांनी सांगितले. 

येत्या 48 तासांत हे खड्डे न बुजवल्यास सत्ताधारी नगरसेवकांसह  मनपासमोर उपोषणास बसू. उपोषण हे लाक्षणिक की बेमुदत ते त्याचवेळी ठरेल. पणजी मार्केट अत्यंत अस्वच्छ असून त्याची आवश्यक ती दुरुस्ती करण्यासंदर्भातील कामेदेखील आयुक्‍त अडवून ठेवत असल्याचा आरोप त्यांनी केला.

आयुक्‍त रॉय हे गोव्याबाहेरील असल्याने त्यांना शहराची काहीच काळजी नाही. लहान-लहान कामांसाठीदेखील नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. नागरिकांची कामे वेळेत होत नाहीत. त्यामुळे त्यांना त्वरित हटवून त्यांच्या जागी शहराची माहिती असलेल्या अधिकार्‍यांची आयुक्‍त म्हणून नियुक्‍ती करावी. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन सोपवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मनपाच्या कामांसंदर्भात आयुक्‍तांनी  महापौरांना विश्‍वासात घेणे आवश्यक असते. परंतु महापौरांकडे फाईल्स येतच नाहीत. लहान-सहान कामांच्या फाईल्सदेखील आयुक्‍त प्रलंबित ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले.
मनपात नुकतीच चालकांसह काही कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करण्यात आली. यामुळे मनपावर वर्षाला 54 लाख रुपयांचा अतिरिक्‍त भार पडणार आहे. परंतु या नियुक्‍तीबाबत महापौर या नात्याने आपल्याला विश्‍वासात घेणे आयुक्‍तांना  महत्वाचे का वाटले  नाही, असा प्रश्‍न चोपडेकर यांनी उपस्थित केला.

यावेळी उपमहापौर अस्मिता केरकर, नगरसेवक उदय मडकईकर, दिनेश साळगावकर, राहुल लोटलीकर व अन्य उपस्थित होते.