Thu, Apr 25, 2019 15:42होमपेज › Goa › मयेवासीयांचे जमिनींच्या हक्काचे स्वप्न पूर्ण करणार : पर्रीकर 

मयेवासीयांचे जमिनींच्या हक्काचे स्वप्न पूर्ण करणार : पर्रीकर 

Published On: Jun 19 2018 1:32AM | Last Updated: Jun 19 2018 1:19AMपणजी : प्रतिनिधी

मयेवासीयांचे त्यांच्या मालकीच्या जमिनींचे हक्क मिळण्याचे स्वप्न अजूनही अपुरे आहे. तसेच गोवा 2018 पर्यंत प्लास्टिकमुक्त करण्याच्या प्रयत्नाला आपल्या आजारपणामुळे काहीसा उशीर झाला आहे. या दोन्ही गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आपले उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केले.

येथील आझाद मैदानावर गोवा क्रांतिदिनानिमित्त  आयोजित शासकीय कार्यक्रमात पर्रीकर बोलत होते. अमेरिकेतून  उपचार घेऊन परतलेल्या पर्रीकर यांनी क्रांतिदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्या सार्वजनिक  कार्यक्रमाला उपस्थिती लावली. 

पर्रीकर म्हणाले की, गोव्यात स्वातंत्र्याचा होमकुंड 18 जून 1946 रोजी पेटवणार्‍या डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या त्यागामुळे आज आम्हाला स्वातंत्र्य उपभोगायला मिळत आहे. त्यांच्या स्मृतीला वंदन करून 72 वर्षांआधी  सुरू झालेला लढा मयेवासीयांची स्वप्नपूर्ती केल्याशिवाय अपूर्णच आहे. मये हा राज्याचा अविभाज्य भाग असून मयेवासीयांचा ज्वलंत प्रश्‍न तातडीने सोडवण्याला आपण प्राधान्य देणार आहे. 

राज्य प्लास्टिकमुक्त बनवण्यासाठी जनतेचे सहकार्य आवश्यक आहे. मात्र, सुशिक्षित लोक गाडीतून कचरा मांडवी नदीत अथवा रस्त्यालगत टाकताना आम्ही पाहतो. यामागे कुठेतरी ज्ञानाचा अभाव असणे हे कारण असू शकते. आम्ही शिकलो तरी ज्ञान मिळवले का, हा खरा प्रश्‍न आहे. यामुळे आजच्या क्रांतिदिनी ज्ञानाची ज्योत पेटवण्याची गरज आहे.  ज्ञानसंपदेने गोवा समृद्ध करण्याचा निश्‍चय करूया. शिक्षणामुळे माहिती प्राप्त होते, मात्र ज्ञान मिळवण्यासाठी क्रांती करण्याची गरज असल्याचे पर्रीकर म्हणाले. 

प्रमुख अतिथी तथा राज्यपाल मृदूला सिन्हा म्हणाल्या की, शालेय पाठ्यपुस्तकात गोव्याच्या स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेले बलिदान आणि त्यांच्या शौर्यकथांचा समावेश होणे गरजेचे आहे. गोवा हे देशातील प्रगत आणि सुशिक्षित राज्य असल्याचे म्हटले जात असले तरी अजूनही काही उणिवा आहेत. या उणिवा दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा.
या कार्यक्रमाला राज्याचे मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा, सभापती डॉ. प्रमोद सावंत, स्वातंत्र्यसैनिक चंद्रकांत पेडणेकर, पांडुरंग कुंकळ्येकर तसेच अन्य स्वातंत्र्यसैनिक आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.