Sun, Jul 21, 2019 16:50
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › ‘कुजिरा’त वाहतूक व्यवस्थापनासाठी मास्टरप्लॅन

‘कुजिरा’त वाहतूक व्यवस्थापनासाठी मास्टरप्लॅन

Published On: Mar 08 2018 1:50AM | Last Updated: Mar 07 2018 11:48PMपणजी : प्रतिनिधी

कुजिरा येथील शिक्षण संकुलात 10 कोटी रूपये खर्च करून पार्किंग व वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी यासाठी एक  महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यासाठी कृती समिती नेमली असून मास्टरप्लॅनही तयार केला आहे. येत्या दोन आठवड्यात  या संदर्भातील निविदा जारी केली जाणार असून एप्रिलमध्ये प्रकल्पाच्या कामांची सुरूवात  होईल, अशी माहिती आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष सिध्दार्थ कुंकळ्येकर  यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

कुंकळ्येकर म्हणाले, येत्या शैक्षणिक वर्षात हे काम पूर्ण करण्यावर भर दिला  जाणार आहे. संकुलात पार्किंग, वाहतुक, पाणी  नियोजन नसल्याने  मोठी गैरसोय होते. या समस्या लक्षात घेऊन नियोजन करण्यासाठी  कृती समिती  नेमली असून  गोवा साधन सुविधा विकास महामंडळ व सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे हे काम हाती घेतले आहे.

वाहतूक व पार्किंग व्यवस्थापनाच्या मास्टरप्लॅनसाठी  यापूर्वी पाटो प्लाझाचे नियोजन केलेले प्लॅनर राहुल देशपांडे अ‍ॅण्ड असोसिएट्स तर्फे यांची नियुक्‍ती करण्यात येणार आहे.  या संकुलात चाफा व पारिजातकाची एकशे पंच्याहत्तर  झाडे लावण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी येणार्‍या  वाहनांना वेगवेगळे मार्ग करण्यात येणार असून, चार चाकी  वाहनांसाठी,  बालरथ, मिनी बसेसना ये-जा करण्यासाठी   स्वतंत्र मार्ग  ठेवण्यात येणार आहेत. मुलांना  शाळेपर्यंत  जाण्यासाठी सुरक्षित  पदपथ असणार आहे.   मुले थेट  शाळेत जावीत, म्हणून  रेलींग घालण्यात येईल. वाहन  व चालत जाणार्‍या विद्यार्थ्यांचा संपर्क येणार नाही याची दक्षता घेतली जाईल. सर्व ये-जा करण्याचे मार्ग सीसीटीव्ही लावून सुरक्षिततेची  काळजी घेतली जाईल. विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी विशेष ड्रॉप झोन्स तयार केले जाणार आहेत, असे कुंकळ्येकर यांनी सांगितले.

शाळेतील कर्मचारी, विद्यार्थी, पालकांना पार्किंगसाठी जागा मिळावी म्हणून क्रीडा प्राधिकरणाच्या जागेत 864 दुचाकी, 256 चार चाकी व 64 बस साठी खास पार्किंग व्यवस्था असेल. पावसाचे पाणी जाण्यासाठी नाला बांधण्यात येणार असून येथे विरंगुळ्यासाठीही सुविधा असतील. 

दुसर्‍या टप्प्यात मल्टी-युटीलिटी क्रीडा संकुल उभारण्यात येईल. यात जीम, स्विमींगपूल, बास्केटबॉल कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट, व्हॉलिबॉल आदी सुविधा असतील. प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार असून येथे आएएस परीक्षा, बँक अशा स्पर्धात्मक परीक्षांचे प्रशिक्षण केंद्र शिक्षण खात्यातर्फे उभारले जाईल.  हे संकुल मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्वप्नातील प्रकल्प असून या स्वप्नाची लवकरच पूर्तता होईल,असेही कुंकळ्येकर यांनी सांगितले.

 पत्रकार परिषदेत  सांत आंद्रेचे आमदार टोनी फर्नांडिस, या संकुलाच्या कृती समितीचे महेश कांदोळकर, संदीप चोडणकर, सुहास सरदेसाई, शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट आदींची उपस्थिती होती.   यावेळी   राहुल देशपांडे यांनी प्रकल्पाचे पीपीटीद्वारे सादरीकरण केले.