Wed, Apr 24, 2019 08:15होमपेज › Goa › म्हापशातही मार्केट बंद

म्हापशातही मार्केट बंद

Published On: Jul 13 2018 12:48AM | Last Updated: Jul 13 2018 12:23AMम्हापसा : प्रतिनिधी

अन्न व औषध प्रशासनाने मडगावात घाऊक मासळी बाजारात केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ म्हापशात मासळी विक्रेत्यांनी मार्केट सकाळपासून बंद ठेवले व सायंकाळी उशिरा पुन्हा सुरू केले.मडगावातील कारवाईची माहिती कळताच म्हापसा मार्केट मासळी विक्रेते संघटनेच्या अध्यक्ष शशिकला गोवेकर यांच्या नेतृत्वाखाली मासळी विक्रेत्या महिलांनी या छाप्याचा निषेध व्यक्त करून मासळी विक्री बंद ठेवली. मात्र, मार्केटमध्ये काही महिलांनी मासळी विक्री सुरू ठेवली असता इतर मासळी विक्रेत्या महिलांनी त्यांना मासळीची विक्री करण्यास मज्जाव केला. कळंगुट व शिवोली मासळी मार्केटमधील मासळी विक्रेत्यांनीही या बंदमध्ये सहभागी होऊन व्यवहार बंद ठेवला. 

म्हापसा मार्केटमध्ये मासळी विक्री बंद राहिल्याचा येथील हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका बसला. या व्यावसायिकांना शेजारील महाराष्ट्र राज्यात जाऊन मासळी खरेदी करून आणावी लागली. शिवाय रोजचे मासळी खवय्ये मार्केटमध्ये मासळी खरेदी करण्यासाठी आले. पण मार्केट  बंद असल्याने त्यांना रिकाम्या हाताने माघारी फिरावे लागले.