होमपेज › Goa › मडगाव पालिकेत ‘कर विभाग’ची कामे रखडली

मडगाव पालिकेत ‘कर विभाग’ची कामे रखडली

Published On: Jan 23 2018 1:15AM | Last Updated: Jan 22 2018 8:49PMमडगाव : प्रतिनिधी

आठ महिन्यांपासून पालिकेतील अधीक्षक लेखापालाला (सुपरिटेंडंट अकाउंटंट) कर आकारणी   विभागाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे. या अतिरिक्त जबाबदारीमुळे कामाचा  बोजा वाढला असून लोकांची  कामे रखडली आहेत.  वारंवार हेलपाटे  मारावे लागत असल्याने   मडगावच्या  रहिवाशांकडून संताप व्यक्त होत आहे. 

मडगाव नगरपालिकेत दररोज अनेक शहरांतून शेकडो लोक कामानिमित्त येत असतात. पालिकेत येरझार्‍या मारूनही कामे होत नसल्याने  रहिवाशी निराश होतात.पालिकेतील अधीक्षक लेखापालांकडे आठ महिन्यांपूर्वी  कर आकारणी विभागाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला होता. हा ताबा सोपविण्यापूर्वी केवळ ही अतिरिक्त जबाबदारी एक महिन्यापुरतीच असेल, असे सांगण्यात आले होते. मात्र या गोष्टीला चक्क आठ महिने ओलांडून गेले तरीही या बाबीचा सोक्षमोक्ष लागलेला नाही.

मडगाव  पालिका अ-गटात मोडते. पालिका क्षेत्रात 87000 इतकी लोकसंख्या आहे. दररोज सुमारे पन्नास फाईल्स तरी पाहाव्या लागतात.  पालिका प्रशासन संचालकाच्या कार्यालयात   मडगाव पालिकेच्या लेखापालाची बदली करूनही सात ते आठ महिने उलटले आहेत. अजूनही त्यांना पुन्हा   पालिकेत आणले जात नसून त्यांना देण्यात येणारा पगारही मडगाव पालिकेकडून केला जात आहे. शिवाय पालिकेच्या  अधीक्षक लेखापालांना अतिरिक्त  ताबा दिला असून कार्यबाहुल्यामुळे दिवसेंदिवस  कामाच्या फाईली पडून रहात आहेत,त्यामुळे  कामे रखडताहेत.परिणामी लोकांचा संतापही वाढत आहे.   

कामे रखडत असल्याने  टेबल उचलून फेकण्याची धमकीही कधीकधी रहिवाशांकडून दिली जाते.त्यामुळे अधीक्षक लेखापालांना कर विभागाचा  अतिरिक्त ताबा सांभाळणे कठीण होऊन बसले आहे. या समस्येविषयी त्यांनी दोन वेळा लेखी तर अनेकदा तोंडी स्वरूपात  पालिका मुख्याधिकार्‍यांना व नगराध्यक्षांना कळविल्याची माहिती पालिकेतून प्राप्त झाली आहे.

‘बदली झालेल्या लेखापालांना पुन्हा पालिकेत आणण्याचा प्रयत्न’

अ-गटात मोडणार्‍या मडगाव पालिका कार्यालयात अन्य पालिकांहून अधिक कामे असतात, असे  उपनगराध्यक्ष टिटो कार्दोज यांनी सांगितले.  काही महिन्यांपूर्वी मडगाव पालिकेतील लेखापालाची   पालिका प्रशासन संचालकांच्या कार्यालयात बदली करण्यात आली आहे.  कायद्यानुसार  पालिकेच्या लेखापालाला  पुन्हा येथे पाठवून द्यायला हवे याकरिता आम्ही त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई व मुख्याधिकारी जॉन्सन फर्नांडिस यांच्याकडे ही समस्या मांडली आहे.