Sat, Feb 16, 2019 21:01होमपेज › Goa › पालिका कर्मचार्‍यांचा संप स्थगित 

पालिका कर्मचार्‍यांचा संप स्थगित 

Published On: Jun 29 2018 12:07AM | Last Updated: Jun 28 2018 11:57PMपणजी : प्रतिनिधी

राज्यातील सर्व नगरपालिकेतील रोजंदारी कामगारांचे प्रश्‍न येत्या 31 ऑगस्टपर्यंत सोडवण्याचे आश्‍वासन नगरविकासमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी दिले आहे. तसेच येत्या सोमवारी (दि. 2 जुलै) मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर  यांच्यासोबत होणार्‍या बैठकीत सदर विषयावर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे पालिका कर्मचार्‍यांचा शुक्रवार (दि. 29) पासून होणारा नियोजित संप स्थगित ठेवण्यात आला आहे, असे अखिल गोवा पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केशव प्रभू यांनी सांगितले.

दरम्यान, मडगाव पालिकेत या संपावरून कामगार संघटनांमध्ये दोन गट पडले होते. या पार्श्‍वभूमीवर मुख्याधिकारी जॉन्सन फेर्नांडिस यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलिसांची मदत घेतली जाईल, असे सांगितले होते.  त्यानुसार गुरुवारी दुपारीच पालिका कर्मचार्‍यांना पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता, अशी माहिती स्वच्छता निरीक्षक विराज आराबेकर यांनी दिली.

आराबेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही परिस्थितीत कचरा  काढण्याचा त्यांचा निर्धार होता. त्यानुसार सकाळी नियमितपणे रोजंदारीवरील दीडशे कामगार आणि पालिकेचे सुमारे सत्तर कामगार कचरा हटवण्याच्या कामासाठी सज्ज ठेवण्यात आले होते.   मात्र, अखिल गोवा पालिका कामगार संघटनेने संप मागे घेण्याचा निर्णय घेतल्याने मडगाव शहरातील कचरा हटवण्यासंबंधीचा वाद तूर्त थंडावला आहे.