होमपेज › Goa › मराठी चित्रपट महोत्सव ८ जूनपासून

मराठी चित्रपट महोत्सव ८ जूनपासून

Published On: May 06 2018 1:53AM | Last Updated: May 06 2018 1:51AMपणजी : प्रतिनिधी

राज्यात 8 ते 10 जून दरम्यान 11 व्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचा ‘कृतज्ञता पुरस्कार’ गोमंतकीय पार्श्‍वगायिका लॉर्ना यांना देण्यात येणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटनास सिनेअभिनेत्री माधुरी दीक्षित यांना विशेष निमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती विन्सन वर्ल्डचे ज्ञानेश मोघे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मोघे म्हणाले की, कला अकादमीत महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर महोत्सवाची सुरुवात ‘वेलकम होम’ या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रीमिअरने होईल. सुबोध भावे यांच्या ‘पुष्पक विमान’ या चित्रपटाने महोत्सवाचा समारोप होईल. सर्व चित्रपट कला अकादमी, आयनॉक्स व मॅकेनिज पॅलेस येथील चित्रपटगृहांमध्ये दाखविण्यात येतील. दरवर्षाप्रमाणे यंदाही चित्रपट जगतातील विविध कलाकार महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. महोत्सवात ‘प्लॅनेट मराठी’तर्फे सिनेतारकांशी विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले  आहे. प्रसिद्ध निवेदक अमित भंडारी सूत्रसंचालन करतील. महोत्सवातील काही चित्रपटांचे विशेष प्रदर्शन वास्को येथील 1930 या सिनेमागृहात करण्यात येईल. महोत्सवासाठीची नोंदणी प्रक्रिया 14 मे पासून सुरू होईल. 

महोत्सवात 17 चित्रपट 

मराठी चित्रपट महोत्सवात एकूण 16 मराठी व एक कोकणी चित्रपट प्रदर्शित केला जाईल. मराठी चित्रपटांमध्ये ‘पिंपळ’, ‘पळशीची पीटी’, ‘इडक’, ‘गुलाबजाम’, ‘न्यूड’, ‘बबन’, ‘आम्ही दोघी’, ‘झिपर्‍या’, ‘कच्चा लिंबू’, ‘लेथ जोशी’, ‘रणांगण’, ‘बकेट लिस्ट’, ‘रेडू’ व ‘व्हॉटस अ‍ॅप लग्‍न’ यांचा समावेश आहे. ‘जुझे’ हा कोकणी चित्रपट व ‘सत्यजित रे : लाईफ अ‍ॅण्ड वर्क’ हा माहितीपट प्रदर्शित केला जाणार आहे.