Sun, Oct 20, 2019 01:09होमपेज › Goa › मराठीचे अस्तित्व संपवणे अशक्य : सामंत 

मराठीचे अस्तित्व संपवणे अशक्य : सामंत 

Published On: Mar 02 2018 12:48AM | Last Updated: Mar 02 2018 12:03AMम्हापसा : प्रतिनिधी

इंग्रजीकरणाच्या ओघात मराठी भाषा नष्ट होईल, इतकी ती दुबळी नाही. मराठी ही अभिजात भाषा आहे. तिचे अस्तित्व कुणीही संपवू शकणार नाही, असे प्रतिपादन मराठी अकादमीचे  अध्यक्ष प्रा. अनिल सामंत यांनी केले.

गोवा मराठी अकादमी बार्देश समितीतर्फे मराठीदिनानिमित्त आनंद निकेतनच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सुरुवातीला कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहण्यात आली. यावेळी व्यासपीठावर प्रमुख वक्ते म्हणून धेंपो महाविद्यालयाचे प्राचार्य  जयप्रभू कांबळे, अविनाश बेळेकर उपस्थित होते. प्रा.जयप्रभू कांबळे यांनी कुसुमाग्रजांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडताना त्यांच्या कवितांचे रसग्रहण केले.

क्रांतीकारी कवितांपासून सामाजिक चळवळीचे भान ठेवून त्यांनी लिहिलेल्या कवितांनी समाजमन ढवळून गेल्याचे त्यांनी सांगितले.  त्यांच्या विविध कविता   ज्ञानपीठ आणतील अशी ग्वाही वि.स. खांडेकरांनी देऊन ठेवल्याचे  त्यांनी  यावेळी सांगितले. जालियनवाला बाग  हत्याकांडावर आधारित असलेली त्यांची कविता आजही अंगावर शहारे आणते, असे सांगून त्यांच्या विविध विषयावरच्या साहित्याचा त्यांनी धावता आढावा घेतला.

त्यानंतर काव्यमैफीलीत विविध कवितांचे  वाचन करण्यात आले. काव्यमैफल उत्तरोत्तर रंगत जाऊन ती यशस्वी झाली. रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांची प्रशंसा केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रसिद्ध रंगकर्मी नाट्यकलाकार स्व.भिकू पै. आंगले यांच्या स्मृती जागविताना एक मिनिट मौन पाळण्यात आले. सुरेंद्र सिरसाट यांनी सूत्रसंचालन केले. दयानंद सांमत यांनी आभार प्रदर्शन केले. सभागृह मराठी प्रेमींनी खचाखच भरुन गेले होते.