Thu, Mar 21, 2019 23:23
    ब्रेकिंग    होमपेज › Goa › मराठी चित्रपट महोत्सवाचा आज समारोप

मराठी चित्रपट महोत्सवाचा आज समारोप

Published On: Jun 10 2018 12:21AM | Last Updated: Jun 10 2018 12:08AMपणजी : प्रतिनिधी  

गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या समारोपाला जॉन अब्राहम निर्मित ‘सविता दामोदर परांजपे’ या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर होणार आहे. हा चित्रपट नाटकाच्या कथेवर आधारित असून ही एक सत्य घटना आहे. हा चित्रपट 31 ऑगस्ट रोजी रिलिज केला जाईल, असे चित्रपटाच्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

चित्रपट महोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कला अकादमीच्या कृष्ण कक्षात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत  चित्रपटाची टीम अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री तृप्ती तोरडमल, राकेश बापट व स्वप्नील बांदोडकर उपस्थित होते.

वाघमारे जोशी म्हणाल्या, की सविता दामोदर परांजपे या चित्रपटात मनुष्याच्या जीवनातील कथा आहेत. नाटकाला न्याय द्यायचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला आहे. जॉन अब्राहम यांची सुरूवातीपासून काहीतरी चांगलं बनवाव एवढीच अपेक्षा होती. त्याप्रमाणे ‘सविता दामोदर परांजपे’ तून सुंदर चित्रपट लोकांपुढे यावा अशी इच्छा आहे.

सुबोध भावे म्हणाले,की या चित्रपटाचे नाटक फार गाजले होते. त्यात स्व. रीमा लागू यांनी भूमिका केली होती. हा चित्रपट 25 ते 30 वर्षांपूर्वीचा काळ दाखवतो. चित्रपटात नाटकातील केवळ कथा घेण्यात आली असल्याने नाटक व चित्रपटाचे मूल्यमापन आपण करू शकत नाही. या चित्रपटात आपली लेखकाची भूमिका आहे. गोव्याचा प्रेक्षक दाद देणारा आहे, असे आपण मानतो. त्यामुळे चित्रपटाचा जागतिक प्रीमियर गोव्यात व्हावा असे ठरवले. 

महोत्सवात आजचे चित्रपट 

मराठी चित्रपट महोत्सवात 10 जून रोजी कला अकादमी येथे  ‘कच्चा लिंबू’ , ‘फरझांड’, ‘पळशीची पीटी’, ‘धप्पा’ व ‘सविता दामोदर परांजपे’ हे चित्रपट प्रदर्शित केले जातील.  मॅकेनिज पॅलेस  1 मध्ये ‘ पिंपळ’, ‘लाठी जोशी’, ‘ गुलाबजाम’, ‘इडक ’, ‘ खरवस’ (लघुपट) व ‘रणांगण’ तर  मॅकेनिज पॅलेस 2 मध्ये ‘रेडु’, ‘व्हॉटसअप लग्न’,  ‘बिबट्या’ (लघूपट) व ‘सत्यजित रे’ हे चित्रपट प्रदर्शित केले जातील. आयनॉक्स 4 मध्ये ‘बकेट लिस्ट’,  ‘निद्राय’,  ‘न्यूड ’,  ‘झिपर्‍या’, ‘बबन’ व ‘आम्ही दोघी’ प्रदर्शित होतील. 1930 वास्को सिनेमागृहात ‘ गुलाबजाम’,   ‘न्यूड ’ व ‘ पिंपळ’  हे तीन  चित्रपट प्रदर्शित केले जातील.