Wed, Mar 27, 2019 01:56होमपेज › Goa › वेर्ला-काणकात बँकेवर दरोडा

वेर्ला-काणकात बँकेवर दरोडा

Published On: Dec 09 2017 1:43AM | Last Updated: Dec 09 2017 12:57AM

बुकमार्क करा

म्हापसा : प्रतिनिधी

म्हापसा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावरील इंडियन ओव्हरसीज बँकेच्या काणका-वेर्ला   शाखेवर शुक्रवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास सहा सशस्त्र दरोडेखोरांनी  दरोडा टाकून  15 लाख रुपयांची रोकड पळवली. कॅशिअरला मारहाण करून पळ काढण्याचा प्रयत्न करताच बाहेर जमलेल्या ग्रामस्थांनी   पाठलाग करून दोघांना पकडले. दरम्यान, चौघे दरोडेखोर बंदुकीतून हवेत गोळीबार करत रोकड  घेऊन पळून गेल्याचे पोलिस अधीक्षक चंदन चौधरी यांनी सांगितले.

चौधरी म्हणाल्या की, इंडियन ओव्हरसीज बँकेच्या काणका शाखेत सायंकाळी 4.30 वा. अचानक  सहा दरोडेखोर घुसले. त्यातील एकाने बँकेचे शटर बाहेरून बंद केले. त्यावेळी बँकेत मॅनेजर स्वेताब भारती आपल्या कक्षात ग्राहकांशी चर्चा करीत होते, तर कॅशिअर त्याच्या कक्षात होता. इतर चौघे कर्मचारी बँकेत होते. दरोडेखोरांनी बँकेच्या कॅशिअरवर बंदूक रोखली व लॉकर्स तसेच तिजोरीची चावी मागितली. तो देण्यास तयार नसल्याचे पाहून त्याला   बेदम मारहाण केली. यात कॅशियर गोविंद नार्वेकर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत.

पिस्तुलधारी दरोडेखोराने मॅनेजरच्या कक्षाबाहेर राहून पैशांची मागणी केली. त्यांनी संध्याकाळच्या वेळेला बँकेत रोकड नसते, असे सांगितले. दरम्यान, दरोडेखोरांचे लक्ष एटीएमकडे गेले. एटीएममध्ये  भरण्यासाठी बँकेत ठेवलेली 15 लाख रुपयांची रोकड त्यांना आयतीच सापडली. बँकेच्या लॉकर्सच्या किल्ल्या त्यांच्या हाती लागल्या नाहीत. मात्र, बँकेत उपस्थित असलेल्या ग्राहकांकडून जी रक्कम मिळाली तीही त्यांनी हिसकावली. सीसीटीव्ही कॅमेरे, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचीही तोडफोड केली. दरम्यान, बँकेत असलेल्या एका मुलीने अर्धे उघडे असलेले शटर पाहून त्याखालून पलायन केले व आरडाओरडा केला. त्यामुळे जवळपासचे लोक बँकेभोवती जमा झाले.

बँकेच्या बाहेरील गोंधळ ऐकून दरोडेखोरांनी हवेत गोळीबार करून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी कोणी पाठलाग करू नये म्हणून लोकांना घाबरवण्यासाठीही त्यांनी गोळीबार केला. यात रस्त्यावरून जाणार्‍या मारुती झेन (जीए-01-आर-9156) च्या मागील काचेवर गोळी लागली व काच फुटली. सुदैवाने मागील सीटवर कुणी नव्हते. डीएमसी कॉलेजचे माजी प्राचार्य राजेंद्र आर्लेकर व त्यांची कन्या गायत्री पुढील सीटवर होत्या त्यामुळे ते दोघे  बचावले. पळणार्‍या दरोडेखोरांपैकी दोघांना लोकांनी पाठलाग करून पकडले व त्यांना बेदम चोप दिला. मारहाणीनंतर बेशुध्द झाल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.