Tue, Mar 19, 2019 03:35होमपेज › Goa › दरोडेखोरांनी रोकड असलेली बॅग टाकून दिल्याचे उघड

दरोडेखोरांनी रोकड असलेली बॅग टाकून दिल्याचे उघड

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 10 2017 12:35AM

बुकमार्क करा

म्हापसा : प्रतिनिधी

इंडियन ओवरसीज बँकेच्या वेर्ला-काणका शाखेवर दरोडा टाकून 15 लाख रुपये घेऊन पलायन केलेल्या दरोडेखोरांनी पळवलेली रोकड असलेली बॅग घाईत बँक परिसरातच टाकून दिल्याने ती शनिवारी पोलिसांच्या हाती लागली. गुन्ह्यासाठी दरोडेखोरांनी वापरलेली रिक्षा (जीए-04-टी-5072) पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. सहा दरोडेखोरांपैकी    चौघांच्या शोधासाठी म्हापसा पोलिसांनी 5 पथके तयार केली असून ती वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिली.

सदर बँकेतून 8 डिसेंबर रोजी 15 लाख रुपयांची रोकड चोरीस गेल्याचे बँकेच्या व्यवस्थापकाने अंदाजे सांगितले होते. ती बॅग शनिवारी उघडली असता त्या बॅगेत 11 लाख 86 हजार 140 रु. ची रोकड सापडली. दरोडेखोर फक्त ग्राहकांच्या सोन्याच्या काही वस्तू व हाती लागेल ती रक्कम घेऊन पसार झाले.  शुक्रवारी सापडलेल्या दरोडेखोरांपैकी अटक केलेल्या एकाचे नाव हरिदास (वय 25) असे असून हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्‍या दुसर्‍या संशयिताचे नाव विजयकुमार दास (27) असे आहे. अटक केलेल्या संशयितांना  न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, चार  दरोडेखोर फरार असून त्यांचा ठावठिकाणा पोलिसांना समजला आहे. दरोड्याच्या थरारावेळी बँकेच्या उघड्या असलेल्या अर्ध्या शटरखालून पोबारा करत लता चिमूलकर या महिलेने बँकेबाहेर  आरडाओरड केली त्यामुळेच लोक जमा झाले व चोरट्यांचा पाठलाग करून दोघांना पकडण्यात यश आले.